पंतप्रधानांच्या निवास स्थानाजवळ अडवला आपचा मार्च

0
7

नवी दिल्ली,दि.17(वृत्तसंस्था) – अधिकाऱ्यांच्या संपावरून नायब राज्यपाल सचिवालयात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन 7 व्या दिवशी सुरू आहे. त्यातच रविवारी आम आदमी पार्टीने पंतप्रधानांच्या निवासाबाहेर घेराव टाकण्यासाठी मंडी हाउस मेट्रो स्टेशनपासून मार्च सुरू केला. परंतु, पोलिसांनी त्यांना संसदेच्या दिशेने जाण्यापासून रोखले आहे. आम आदमी पक्षाला आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले. यानंतर सीएम केजरीवाल यांनी ट्वीट करून मोदींना तानाशहा म्हटले आहे. तर दुसरीकडे, IAS Association ने सांगितल्याप्रमाणे, दिल्लीत अधिकारी संपावर नाहीत. आम आदमी पक्षाचे सरकार अफवा पसरवत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि गोपाल राय एलजी अनिल बॅजल यांच्या कार्यालयात 11 जूनपासून धरणे आंदोलन करत आहेत.

आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी सांगितले, “दिल्लीच्या लोकनिर्वाचित सरकारला काम करू दिले जात नाही. कांग्रेस, भाजपची टीम बी तयार झाली आहे. आम्ही नायब राज्यपाल दिल्ली पोलिस आणि पीएमओला आश्वस्त करतो की या आंदोलनात हिंसाचार होणार नाही.” संयुक्त पोलिस आयुक्त अजय चौधरी म्हणाले, आपचे मार्च संसदेच्या मार्गापासून पुढे जाऊ दिला जाणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तसेच हिंसा थांबवण्यासाठी पूर्ण उपाय-योजना आधीच करण्यात आल्या आहेत. डीएसपी मधुर वर्मा म्हणाले, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन, पटेल चौक, जनपथ स्टेशन आणि लोक कल्याण मार्ग मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले आहेत.