निराधारांना महिना 2 हजारांची मदत द्या-खा.नवनीत राणा

0
19

नवी दिल्ली(वृ्त्तसंस्था)दि.25ः – महाराष्ट्रातील अमरावती येथील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी पुरस्कृत अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी संसदेच्या सुरु असलेल्या अधिवेशनात निराधारांना 2 हजार रुपये मदत देण्याची मागणी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. देशातील निराधारांना श्रावण बाळ निराधार योजनेअंतर्गत केवळ 200 रुपये महिना केंद्र सरकारकडून देण्यात येतो. तर राज्य सरकारकडूनही केवळ 400 रुपये भत्ता मिळतो. मात्र, सद्यपरिस्थिती पाहाता, देशातील वाढती महागाई लक्षात घेता. सहाशे रुपये महिन्यात या निराधार, गरजू-गरिबांना आपला उदरनिर्वाह कसा करायचा?. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत विचार करुन निराधार, गरिब, बेरोजगार, अंध-अपंग यांना केंद्र सरकारतर्फे किमान 2 हजार रुपयांचा मदत भत्ता द्यावा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा(कौर) यांनी लोकसभेत केली.प्रधानमंत्री हे देशाचे आहेत, ते कोण्या एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष द्यावे, असेही खा. नवनीत राणा म्हणाल्या.

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रात  गरीबांसाठी घरकुल योजनेचा लाभ मिळायला हवा. राज्याला केवळ 7 लाख घरकुल योजनेचं लक्ष्य देण्यात आले आहे. पण, योजना ही 20 ते 25 लाख घरकुलाची मंजूर करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. तसेच, देशातील निराधारांना सरकारकडून मदत भत्ता म्हणून केवळ 200 रुपये देण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच राज्य सरकारचे 400 आणि केंद्राचे 200 असे मिळून केवळ 600 रुपये भत्ता 65 वर्ष वयावरील निराधारांना सरकारकडून मिळतो. मात्र, आजमित्तीला आपण चहा प्यायला गेलो तरी, 20 रुपये लागतात. मग, या निराधारांना 600 रुपयांत महिना कसा घालवायचा? असा प्रश्न नवनीत यांनी उपस्थित केला. तसेच, निराधार, अंध-अपंग, बेरोजगारांना केंद्र सरकारने किमान 2 हजार रुपये महिना भत्ता द्यावा, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली.