‘ग्रीनपीस इंडिया’चे कामकाज एका महिन्यात बंद?

0
9

वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. 6:- पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रीनपीस इंडिया या स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) भारतातील कामकाज बंद करण्याचा इशारा आज दिला. केंद्र सरकारने ग्रीनपीस इंडियाची देशातील एकूण सात बॅंक खाती गोठविली आहेत. हा निर्णय मागे न घेतल्यास एका महिन्याच्या आत भारतातील कामकाज बंद केले जाईल, असे ग्रीनपीस इंडियातर्फे आज स्पष्ट करण्यात आले.

ग्रीनपीस इंडियाच्या प्रमुखांनी आज सांगितले की, सरकारने संस्थेची बॅंक खाती गोठविल्यामुळे एक महिना पुरेल एवढाच निधी शिल्लक आहे. त्यामुळे सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर एका महिन्यात कामकाज बंद करण्यात येईल. संस्थेतील कर्मचाऱ्यांना याबाबत आज कल्पना देण्यात आली आहे.

परदेशातून मिळणाऱ्या देणगीच्या हिशेबामध्ये कमतरता असल्याचे कारण दाखवत गृह मंत्रालयाने एप्रिल महिन्याच्या सुरवातीला ग्रीनपीस इंडियाची सात बॅंक खाती गोठविली होती. गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा हा निर्णय अतिशय धोकादायक असल्याचेही ग्रीनपीसने म्हटले आहे.