एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची मागणी

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई- शिवसेनेने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यात दुष्काळ पडला आहे. अशा वेळी शेतक-यांना आधार देण्याची गरज होती. मात्र खडसे यांनी मोबाइल बिलाबाबतचे वादग्रस्त वक्तव्य करून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यात खडसेंकडेच कृषिमंत्रीपदाची जबाबदारीही आहे. अशा वेळी शेतक-यांचा अपमान करणा-या खडसेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे राज्यपालांना दिलेल्या निवेदनात शिवसेने म्हटले आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने याबाबत गुरुवारी राजनभवनात राज्यपालांची भेट घेतली.
मोबाइलचे बिल भरायला शेतक-यांकडे पैसे आहेत, पण वीजबिल भरायला पैसे नाहीत, असे वक्तव्य खडसे यांनी केले होते. त्यानंतर शिवसेना आणि खडसे यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू झाले. यात खडसे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच लक्ष करत त्यांना शेतीतले काय समजते, असा प्रश्न केला होता. खडसेंचे हे वक्तव्य शिवसेनेच्या जास्तच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे काहीकरून खडसे यांना लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रमच शिवसेनेने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसनेने खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मराठवाडयात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे तिथे तात्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. खरे तर शिष्टमंडळ दुष्काळाबाबत समस्या मांडण्यासाठी गेले होते. पण, त्यांनी त्यात खडसेंच्या राजीनाम्याची मागणीही पुढे रेटली. त्यामुळे ही भेट खडसेंच्या राजीनाम्यासाठी होती की दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नासाठी होती, याची चर्चा राजभवनावर होती.