काल नागपुरात होतो; मग बैठक कशी होणार; तुमानेंनी केले स्पष्ट

0
17

नागपूर : मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली होती. ‘काल मी नागपुरात होतो’ असे म्हणत कृपाल तुमाने यांनी बैठक झाली नसल्याचे स्पष्ट केले. 

द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्यावरून शिवसेनेच्या  खासदारांमध्ये मतप्रवाह असल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना इतर खासदारांना द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे निर्देश द्यायला सांगितले होते. शेवाळे यांच्यावतीने पत्रही सादर करण्यात आले होते. दुसरीकडे शिवसेनेचे काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाशी हातमिळवणी करू शकतात, असे वृत्त होते.

शिवसेनेत गोंधळ?

देशात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित केले आहे. तर एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे गटात गेलेले तसेच जाऊ इच्छिणाऱ्या खासदारांनी उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांना मतदान करण्याची मागणी केली आहे. यामुळे हा घोळ निर्माण झाला आहे. तसेच बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी १२ खासदार लवकरच पक्ष बदलतील असा दावा केला होता, हे विशेष…

भावना गवळी माध्यमांसमोर भूमिका मांडणार

शिवसेनेच्या खासदारांमध्ये कुठलीही चलबिचल नाही. खासदार भावना गवळी यांना प्रतोदपदावरून का हटवले? याचे कारण पक्षश्रेष्ठीच सांगू शकतील. या विषयावर माझे बोलणे योग्य ठरणार नाही. खासदार भावना गवळी यांच्याशी मी बोललो आहे. त्या माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडणार आहे. मी नागपुरातच आहे. मंगळवारी (ता. १२) पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे. त्यासाठी दिल्लीला जाणार आहे, असेही कृपाल तुमाने म्हणाले.

एनडीएच्या उमेदवार द्रौपती मुर्मू या आदिवासी महिला आहे. त्यांना समर्थन दिले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या काही लोकांकडून पुढे आली आहे. खासदारांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत, असे कालच सांगितलेले आहे. आमचे खासदार दिल्लीत आहेत. माझ्या दिल्लीतील घरी काल बैठक झाल्याचे वृत्त होते. मात्र, अशी कुठलीही बैठक झाली नाही. कारण, काल मी नागपुरात होतो, असे खासदार कृपाल तुमाने  म्हणाले.