धनुष्यबाण चिन्हाच्या निवाड्यावर आज दिल्लीत सुनावणीची शक्यता:ठाकरे गटाची 9 लाख, तर शिंदे गटाची दीड लाख प्रतिज्ञापत्रे

0
29

मुंबई-अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाचा निर्णय शुक्रवारी (ता.7) होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर असलेल्या या महत्त्वपूर्ण सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्यास वेळ मागवून घेतला होता. उर्वरित कागदपत्रे 7 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिले होते. शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची ठाकरे गटाने मागणी केली होती. त्यामुळे वेळ वाढवून देण्यात आला होता. शिंदे गटाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सुमारे दीड लाख प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत, तर प्रतिस्पर्धी ठाकरे गटाने 8 ते 9 लाख प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत. पक्षातील बहुमत कोणाकडे आहे या मुद्द्याआधारे निवडणूक आयोग साधारणपणे निर्णय घेतो. आयोगापुढे कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज सुनावणीची शक्यता आहे.

दोन्ही गटाचे दावे-प्रतिदावे

शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधिमंडळ पक्ष सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य असल्याचे सांगत आहे, तर शिवसेना पक्षाची कार्यकारिणी व पदाधिकारी हे आपल्यासोबत असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. आयोगाच्या या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.