विरोधकांचा खात्मा अन् मित्रपक्षांवर विषप्रयोग हीच भाजपची खरी नीतिमत्ता- उद्धव ठाकरे

0
13
मुंबई- भाजप सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे. देवभूमी उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकारचे अकस्मात निधन झाल्याची वार्ता आली आहे. पण हा मृत्यू नसून ती हत्या आहे. विरोधकांना खतम करायचे व मित्रांवर विषप्रयोग करायचे यामुळे देशाची घडी विस्कटून जाईल. एकपक्षीय राजवटीची आस आणीबाणी व हुकूमशाहीपेक्षा भयंकर ठरेल असा खणखणीत इशारा शिवसेनेने मोदी सरकारला दिला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र सामनात उत्तराखंड प्रकरणावर लोकशाहीचा मृत्यू की हत्या या शीर्षकाखाली अग्रलेख लिहला असून, भाजपने विरोधकांचा खात्मा करण्याचे धोरण कसे अवलंबले आहे यावर विचार मांडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, काँग्रेस विचारसरणीस व त्यांच्या भ्रष्ट कार्यपद्धतीला आमचाही विरोध आहे, पण जे सरकार लोकशाही मार्गाने सत्तेवर आले ते लोकशाही मार्गानेच घालवायला हवे. उत्तराखंडच्या निमित्ताने देशातील विरोधकांना एकत्र येण्याची संधी आपणच मिळवून देत आहोत. लोकशाहीमध्ये विरोधी सुरांचे महत्त्व सगळ्यात जास्त आहे.