मूल ,कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

0
7

मूल : ग्रामीण राजकारणाचे केंद्रस्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृउबास मूलच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीने खासदार सर्मथक गटाच्या शेतकरी महाविकास आघाडीला धूळ चारत गुलाल उधळला असून, पुन्हा एकदा समितीवर संतोष रावत यांनी शेतकरी विकास आघाडीच्या रूपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. खासदार सर्मथकांना साधा भोपळाही फोडता आला नाही, हे विशेष.
बाजार समितीच्या अठरा संचालकांपैकी हमाल तोलारी मतदार संघात रमेश बरडे अविरोध निर्वाचित झाल्याने शुक्रवारी सतरा संचालक पदांसाठी गुप्त मतदान पार पडले. अकरा संचालक निवडून द्यावयाच्या सेवा सहकारी संस्था मतदार संघात सतरा उमेदवारांनी नशीब अजमावले. या मतदार संघाच्या सर्वसाधारण गटात काँग्रेसच्या रावत गटाचे बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, राकेश र%ावार यांचेसह माजी संचालक राजेंद्र कन्नमवार, अखील गांगरेड्डीवार आणि किशोर घडसे यांनी पुन्हा संचालक पदाची खुर्ची बळकावली आहे. या गटात रावत गटाचे सुनिल गुज्जनवार आणि हसन वाढई असे एकूण सातही संचालक निर्वाचित झाले आहे. या गटात खासदार सर्मथक गटाचे किरण पोरेड्डीवार, सुधाकर बांबोळे आणि पराग वाढई यांना पराभव स्वीकारावा लागला. सेवा सहकारी संस्थेच्या महिला राखीव गटात कॉग्रेसच्या रावत गटाच्या चंदा कामडी आणि उषा शेरकी विजयी झाल्या, खासदार सर्मथक गटाच्या वनिता हरडे पराभुत झाल्या, इमाव गटातून कॉग्रेसच्या रावत गटाचे सुमीत आरेकर यांनी खासदार सर्मथक गटाचे नरेंद्र चैधरी यांचा पराभव केला तर विजाभज राखीव गटात बाजार समितीचे माजी उपसभापती रावत गटाचे संदीप कारमवार यांनी खासदार सर्मथक गटाचे पंकज पुल्लावार यांना पराभवाची धूळ चारली. चार संचालक निवडून दयावयाच्या ग्राम पंचायत मतदार संघात दोन संचालक निवडून दयावयाच्या सर्वसाधारण गटात काँग्रेसच्या रावत गटाचे राहुल मुरकुटे आणि लहुजी कडस्कर यांनी बाजी मारली असून त्यांनी खासदार सर्मथक गटाचे राकेश दहीकर आणि भाजप विचाराचे स्वतंत्र उमेदवार रंजीत सर्मथ यांचा पराभव केला. अनुसूचित जाती जमाती गटातून रावत गटाच्या शेतकरी विकास आघाडीचे शालीक दहीवले यांनी खासदार सर्मथक गटाचे अरविंद वनकर आणि भाजप विचाराचे स्वतंत्र उमेदवार प्रशांत बांबोळे यांचा पराभव केला. आर्थिक दृष्टया दुर्बल गटातून कॉग्रेसच्या रावत गटाचे जालींदर बांगरे यांनी खासदार सर्मथक गटाचे भुपेश दुर्गे यांना पराभवाची धुळ चारली. दोन संचालक निवडून द्यावयाच्या व्यापारी अडते मतदार संघात तुलाराम घोगरे या अडत्याने तर अमोल बच्चुवार हे व्यापारी सिंकदर ठरले आहे. या गटात कासू वेंकन्ना साईलू आणि सुधाकर मोहुर्ले पराभूत झाले. या गटात कॉग्रेसच्या रावत गटाच्या शेतकरी विकास आघाडीने अडते तुलाराम घोगरे आणि सुधाकर मोहुर्ले यांना पाठिंबा दिला होता. अठरा संचालकीय मूल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसचे वडेट्टीवार व रावत गटाने सोळा जागेवर विजय मिळवत समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीची शुक्रवारी निवडणूक पार पडली. शनिवारी सकाळी ९ वाजता मतमोजणी घेण्यात आली. यात काँग्रेसने १८ पैकी १३ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
या निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध शेतकरी संघटना भाजप अशी थेट लढत होती. मात्र, शेतकरी संघटनेला फक्त ४ जागेवर समाधान मानावा लागले व भाजपला खाते खोलण्यात यश आले नाही. मात्र, गजानन पाटील जुनाके यांच्या नेतृत्वात कोरपना कृउबासत गोंडवाना गणतंत्र पाटीची एन्ट्री झाली. काँग्रेसचे नेते तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आ. सुभाष धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे उत्तम पेचे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष श्रीधर गोडे, इस्माईल शेख, मनोहर चन्ने, नितीन बावणे तसेच सर्व काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी हे आवाहन स्वीकारत १८ पैकी १३ जागा जिंकून झेंडा फडकविला आहे.
कृउबाच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसचे गणेश गोडे, ज्ञानेश्‍वर आवारी, नामदेव जुमनाके, अशोक बावणे, वंदना बल्की, विठाबाई देवाळकर, पुंडलिक गिरसावळे, इरफान शेख, विनोद नवले, राजीव ढवळे, उत्तम कराळे, भालचंद्र बोडके, एजाज शेख असे काँग्रेसचे १३ तर शेतकरी संघटनेचे सुनील बावणे, राजू ढवळे, विकास दिवे, दत्ता कांबळे असे ४ तर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे निशिकांत सोनकांबळे असे संचालक निवडून आले. राजुरा विधानसभेचे आ. सुभाष धोटे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.