महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

0
11

कोण किती जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला जागावाटपाचा आकडा

*मुंबई:- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले आहे की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत (भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी-अजित) जागावाटप निश्चित झाले आहे.

फडणवीस म्हणाले की, भाजप राज्यातील 26 जागांवर निवडणूक लढवणार आहे. फडणवीस यांचे हे वक्तव्य अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आले आहे. ज्यात त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर इतर राज्यांमध्ये निवडणुका सुरू असल्याचे सांगितले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जागावाटपावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असं ते म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, भाजप 26 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे 22 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2019 मध्ये, भाजपने लोकसभेच्या 25 जागा लढवल्या होत्या आणि तत्कालीन शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी भाजपने 23 आणि सेनेने 18 जागा जिंकल्या होत्या.

आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रकरणाची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच महायुतीत कोणतेही मतभेद नसून याबाबतचं वृत्त त्यांनी फेटाळून लावले आहे. फडणवीस पुढे म्हणाले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती खऱ्या अर्थाने एकजूट झाली असून त्यात कोणतेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्री शिंदे ठाम आहेत. नेतृत्व बदलाची योजना असल्याच्या वृत्ताला काही अर्थ नाही. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. नागपुरातील माझ्या पारंपरिक जागेवरून विधानसभा निवडणुकीत मी पक्षाचा उमेदवार असेल. महायुतीतील घटक पक्षांच्या बैठकीत जागावाटपाचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील सर्व 48 लोकसभेच्या जागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, असेही ते म्हणाले. फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महायुती राज्यात किमान 40 ते 42 जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.