काँग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर; कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यातून रविंद्र धंगेकर रिंगणात

0
12

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीर करण्यात आली असून सात जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.अमरावतीमधूून बळवंत वानखेडे, पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे.

 

काँग्रेसकडून पहिल्या यादीमध्ये नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. नंदुरबारमधून गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर लातूरमधून शिवाजीराव कलगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोण आहेत वसंतराव चव्हाण ?

नांदेडमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आलेले वसंतराव चव्हाण हे पूर्वीच्या बिलोली व आताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते आहेत. ते आणि त्यांचे घराणे पूर्वी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. ‘राष्ट्रवादी’ने त्यांना 2002 साली विधान परिषदेवर नियुक्त केले, पण 2009 मध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंडखोरी करून विजयी झाले. तेव्हापासून त्यांची राजकीय नाळ काँग्रेसशी जुळली. नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. 2014 साली दुसऱ्यांदा विजयी झालेल्या चव्हाण यांचा 2019 मध्ये भाजपाकडून पराभव झाला.अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नायगाव मतदारसंघातील राजकीय स्थितीचा विचार करून वसंतरावांनी काँग्रेस पक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला.