तेंदूपान संकलनाचे अधिकार सी.एफ.आर अंतर्गत ग्रामसभेला दया- आम.कोरोटे

0
7

देवरी,दि.२५: आमगाव-देवरी विधानसभेतील देवरी व सालेकसा ह्या आदिवासी नक्षलग्रस्त दुर्गम तालुक्यात शासनातर्फे तेदूपान संकलनाची सरकारी फळी न लावता शासनाने सी.एफ.आर अंतर्गत नेमून दिलेल्या ग्रामसभा मार्फतच तेदूपान संकलनाची फळी लावावी जेणे करून ग्रामसभांना योग्य हमी भाव देण्यात सोपे होईल. त्यामुळे याभागात राहणा-या लोकांना योग्य मोबदला मिळेल. परिणामी, लोकांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यास मदत होईल. यासाठी तेदूपान संकलनाचे सर्व अधिकार सी.एफ.आर. अंतर्गत ग्रामसभेंना दया, अशी मागणी या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी शासनाकडे केली आहे.
सविस्तर असे की, महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीीसगड सीमेलगत असलेला आमगाव -देवरी विधानसभेतील देवरी व सालेकसा तालुक्यातील बहुतेक भाग हे जंगलाने व्यापलेला व वनसंपत्तीने संपन्न असा भाग आहे. तालुक्यातील जनतेचे मुख्य उत्पादनाचे साधन म्हणजे भातशेती. तालुक्यात वनसंपत्तीचे भांडार आहेत. जसे जांभूळ, चार, मोहफूल, आंबे, चिंच, हिरडा, बेहडा इत्यादी तसेच मुख्य उत्पादनापैकी एक म्हणजे तेंदुपान. दरवर्षी मे महिन्यात तेंदू पान संकलनाला सुरुवात होते. यावर्षी वन्य प्राण्यांच्या भीतीला झुगारून तालुक्यातील लोकांनी पान तोडणीला सुरुवात केली.
मागील कित्येक वर्षापासून तालुक्यात तेंदूपाने संकलनाचा व्यवसाय अविरतपणे सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात तेंदू युनिटच्या लिलावाची प्रक्रिया सुरू होते. तेंदू हंगाम हे मे महिन्यात १५ ते २० दिवसांकरिता असते. आदिवासी बांधवाच्या कुटुंबातील दहा वर्षाच्या मुलापासून ते ६० ते ७० वर्षाच्या वयाचे लोक तेंदूपाने तोडणीला जंगलात जातात. तेंदू पाने गोळा करताना मजुरांवर वन्यप्राण्यांचे हल्ले वारंवार होत असल्याच्या घटना घडतात. अशा कठीण परिस्थितीत सुद्धा तालुक्यातील मजूर उन्हाळ्याचे चटके सोसून दिवसभर जंगलात पोटाची खळगी भरण्या करिता राबराब राबतात.
तरी शासनाच्या वतीने लावण्यात येणा-या सरकारी पान फळीत मजूरांना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे तेंदूपान संकलन करणा-या लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो. तरी या कारणांनी तेदूपान संकलनाचे सर्व अधिकार सी.एफ.आर. अंतर्गत ग्रामसभेंना दया, अशी मागणी या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी शासनाकडे केली आहे.