अर्जुनी मोर.-गेल्या दहा वर्षापासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे काँग्रेसने 70 वर्षात काय केले असा डंका मारीत आहेत. मात्र आपण दहा वर्षापासून काय करीत आहोत हे सांगितले जात नाही. देशात नोटबंदी करून काळा पैसा बाहेर काढू व भ्रष्टाचार थांबवू असा केवळ वल्गणा करीत आहेत. ना काळा पैसा आला ना भ्रष्टाचार थांबला. महाराष्ट्रात सध्या तोडफोडीचे राजकारण करून सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने महायुती स्थापन केली. मात्र महाराष्ट्रातील जनता फार हुशार आहे. लोकसभेत 400 पार चा नारा लावणारे भाजपा 240 वर थांबली. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदार जनता भाजपा महायुतीला त्यांची जागा दाखवून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करेल. असा विश्वास व्यक्त करून पायलट म्हणाले की” महायुती फर्जी, उमेदवार फर्जी, किसको मत देना है ये आपकी मर्जी” त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप बनसोड यांच्या पंजा चिन्हाची बटन दाबून मोठ्या फरकाने विजयी करण्याचे आवाहन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा युवा नेते सचिन पायलट यांनी केले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस महाविकास आघाडीचे तडफदार उमेदवार दिलीप बनसोड यांचे प्रचारार्थ जिल्हा परिषद हायस्कूल अर्जुनी मोर. मोर.च्या पटांगणात तारीख 13 आयोजित प्रचार सभेत पायलट बोलत होते. पुढे बोलताना सचिन पायलट म्हणाले की केंद्रातील भाजपा सरकारने शेतकरी विरोधी व उद्योगपतींना फायद्याचे असे तीन कायदे केले. मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाने सरकारला तीनही कायदे रद्द करावे लागले. सध्याचे केंद्र सरकार ही शेतकरी विरोधी आहे. गैर भाजपा मुख्यमंत्र्यांना ईडीसीबीआयच्या धाक दाखवून जेलमध्ये टाकले जाते. भारताचे संविधान या देशातील शेतकरी शेतमजूर व गोरगरिबांच्या हिताचे आहे .त्यामध्ये छेडछाड करण्याचे महापाप भाजपा सरकार करीत आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची असून आपले भविष्य बनविणारी असल्याने महाविकास आघाडीची महाराष्ट्रात सरकार आणण्यासाठी अर्जुनी मोरगाव विधानसभेतून काँग्रेसचे उमेदवार दिलीप बनसोड यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी उमेदवार दिलीप बनसोड म्हणाले की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र अनेक समस्यांनी ग्रासले आहे. झासीनगर सिंचन योजना रखडलेली आहे. कोदामेढीचा पुनर्वसनाचा प्रश्न रेंगालेला आहे, 2009 पासून सत्ता उपभोगणाऱ्यांनी या क्षेत्राकडे सातत्याने दुर्लक्ष केले.मी लोकांची कामे करणारा माणूस आहो. या विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या पायाला टोचलेला काटा दातांनी काढण्याची माझी तयारी असल्याने या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पंजा चिन्हाची बटन दाबून मला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक व्यक्तींनी बाहेरची पार्सल म्हणून हिणवणाऱ्यांना सडेतोड उत्तर देऊन दिलीप बनसोड अर्जुनी मोरगाव विधानसभेतील असून गोंदिया जिल्ह्यातील तडफदार नेतृत्व असल्याचे सांगितले. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता आपली मते पंजाला देण्याचे आव्हान केले. मंचावर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, खासदार डॉ. प्रशांत पडोळे ,उमेदवार दिलीप बनसोड ,आमदार अभिजीत वंजारी, विजयाताई रेड्डी, अमर वराळे, भागवत नाकाडे, शैलेश जयस्वाल, किरण कांबळे, चंद्रशेखर ठवरे, श्रीकांत घाटबांदे, कविता कापगते, अनिल दहिवले, घनश्याम धामट, प्रमोदभाऊ पाऊलझगडे, आनंदकुमार जांभुळकर ,डॉ. भारत लाडे, शीला उईके ,नूतनताई दहिवले, पौर्णिमा शहारे, गंगाधर परशुरामकर, यशवंत परशुरामकर व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.