१० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापसी

0
216

भंडारा : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून काही काळ घालवलेले माजी खासदार मधुकर कुकडे यांनी तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा भाजपात घरवापसी केली आहे. काटोल येथील जाहीर सभेत भाजप नेते शिवराजसिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. मतदानाच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी कुकडे यांनी पक्षांतर केल्यामुळे तुमसर मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले असून त्यांच्या पक्ष बदलामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चरण वाघमारे यांना फटका बसणार का ? कुणबी समाजाचे मत आता कुणाकडे जाणार ? याबाबत राजकीय समिकरणे जुळवली जात आहेत.

१९९० मध्ये कुकडे यांनी काँग्रेसची सोडून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना तुमसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. यात ते पराभूत झाले. त्यानंतर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली. यावेळी कुकडे यांना भाजपकडून संधी मिळाली. भाजपवासी झालेल्या कुकडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली. त्यानंतरच्या सलग दोन निवडणुकांतही त्यांनी विजय मिळविला. २००९च्या निवडणुकीत मात्र त्यांना काँग्रेसचे अनिल बावनकर यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली. पक्षाच्या या निर्णयाने नाराज झालेल्या कुकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या कुकडे यांच्या पदरी निराशाच आली. अखेर त्यांनी भाजपात घरवापसी केली.