दानवेंच्या निशाण्यावर मुख्यमंत्री की शेलार?

0
12

मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईत घेण्यात आलेल्या “अटलबंधन‘ सोहळ्याची मला कुठलीही कल्पना दिलेली नाही, अशी उघड नाराजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील अटलबंधन सोहळा आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आयोजित केला होता. त्यामुळे दानवे यांची ही नाराजी शेलार की फडणवीस यांच्या विरोधात आहे, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी शेलार यांची नियुक्ती माझ्या स्वाक्षरीने झाली असली, तरी मुंबई भाजपमध्ये सध्या काय सुरू आहे, याची मला माहिती नसल्याचेही दानवे यांनी सांगितले. “अटलबंधन‘ची मोहीम फक्त मुंबईपुरतीच मर्यादित आहे की ती राज्यात राबविली जाणार आहे, याबाबतही मला काहीच सांगितलेले नाही. शेलार पक्षाची शिस्त पाळत नसल्याचेही ते म्हणाले.

भाजप कार्यकारिणी कोणताही कार्यक्रम घेत असेल तर त्यासाठी पूर्वपरवानगी प्रदेशाध्यक्षांकडून घेणे बंधनकारक आहे; पण सध्या शेलार गट विरुद्ध दानवे गट अशा पद्धतीची कार्यपद्धती भाजपमध्ये राबविली जात आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री व दानवे हेसुद्धा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांविषयी नाराज असल्याची चर्चा आहे. दानवे यांच्या नाराजीनाट्यानंतर शेलार यांनी मात्र या विषयावर मौन धारण केले आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही “ते काहीच बोलणार नसल्याचे‘ त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात येत होते.