पक्षातील लोकांनीच घात केला – एकनाथ खडसे

0
6

जळगाव,दि.2- भारतीय जनता पक्ष हा कधीच एका जातीचा किंवा धर्माचा पक्ष म्हणून उभा केला नाही. गेली 40 वर्ष झटून हा पक्ष उभा केला. त्या पक्षाची बदनामी नको म्हणून राजीनामा दिला, असे सांगत 62 वा वाढदिवस साजरा करताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांनी घात केल्याचा टोला पक्षातील विरोधकांना लगावला. मुक्ताईनगरमधील कोथळी या खडसेंच्या मुळ गावी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाच्या जाहीर कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, कृषी आणि फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते.जाहीर सभेआधी उघड्या जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्रीपद गेल्यानंतर खडसेंचे हे सर्वात मोठे शक्तीप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे.
दाऊदच्या पाकिस्तानातील घरी फोन, जावयाची लॅम्बॉर्गिनी कार, भोसरीतील भूखंड, कारखान्यासाठी हजारो एकर जमीन लाटल्याच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे ठासून सांगत एकनाथ खडसे म्हणाले, विरोधकांशी लढलो असतो पण स्वपक्षीयांनीच घात केला.राजीनाम्याचे शल्य खडसेंनी यावेळी बोलून दाखविले. कोणत्या पक्षात गेले पाहिजे हे ही न कळणाऱ्या वयात तत्कालीन जनता पार्टी आणि आजच्या भारतीय जनता पक्षाची कास धरली. 40 वर्षांपूर्वी हा पक्ष राजाभाऊ आणि मी जिल्ह्यात, गावागावत फिरून उभा केला, असे खडसेंनी सांगितले.
मंत्रीपद गेल्यानंतरही खडसेंच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले नाही. याचे रहस्य सांगताना त्यांनी एक हिंदी शायरीचा आधार घेत म्हटले, ये मुस्कूराती जिंदगी जिंदादिली का नाम है…