चित्रा कापसे/तिरोडा-तालुक्यात नवीन घरगुती गॅस कनेक्शनचा पुरवठा गेल्या काही काळापासून बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार अमृतलाल पारधी(कवलेवाडा क्षेत्र) यांनी सोमवारी तिरोडा तहसील कार्यालयात तहसीलदार नारायणजी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन घरगुती गॅस कनेक्शनचा पुरवठा तातडीने पूर्ववत सुरू करण्याबाबत निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नवीन गॅस कनेक्शन बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत स्वयंपाकासाठी गॅसची गरज अधिक असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत तात्काळ नवीन घरगुती गॅस कनेक्शन सुरू करून पात्र लाभार्थ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी किरणकुमार पारधी यांनी सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आपला पाठपुरावा भविष्यातही कायम राहील, अशी भूमिका व्यक्त केली.





