‘रिपब्लिकन फ्रंट’खाली एकवटले गट

0
8

नागपूर दि. १३ – : काँग्रेसच्या पाठबळावर विधान परिषदेत जाणारे पीपीप्लस रिपब्लिकन पार्टीचे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रिपब्लिकन गटांनी एकत्र करीत ‘रिपब्लिकन फ्रंट’ स्थापन केला आहे. या फ्रंटच्या माध्यमातून महापालिलका निवडणुकीत ७५ जागा लढविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. तशी घोषणा त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

सर्व आंबेडकरी राजकीय कक्षांची मोट बांधल्यामुळे नवे राजकीय समीकरण उदयास येते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आंबेडकरी पक्षांचा हा फ्रंट काँग्रेसला समर्थन देणार की वेगळे अस्तित्व दाखविणार, असाही प्रश्न या निमित्त उपस्थित झाला आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादीवर दबाव टाकण्यासाठी तर हा फ्रंट तयार करण्यात आला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एरव्हीच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांकडे वळणारी व त्यामुळे विखुरणारी आंबेडकरी मते या फ्रंटच्या निमित्ताने एकत्रित आली असली तरी आपले राजकीय अस्तित्व ते कसे निर्माण करतील व बहुजन समाज पक्षासमोर कसे आव्हान निर्माण करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रविभवन येथे गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत कवाडे म्हणाले, सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने विविध रिपब्लिकन गट एकत्र आले आहेत.

रिपब्लिकन पक्ष व आंबेडकरी संघटनांना आणखी सोबत जोडण्यात येणार आहे. ज्यांना या फ्रंटमध्ये यायचे आहे, त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. इतर पक्ष किंवा आघाड्यांशी सुद्धा चर्चा केली जाईल. निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. अनुसूचित जाती, जमाती यांच्यासह ओबीसी, अल्पसंख्याक, मुस्लीम आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सुद्धा संधी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.