कस्तूरचंद पार्कवर होणार गडकरींचा नागरी सत्कार

0
7

नागपूर,दि.7 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा येत्या २७ मे रोजी वाढदिवस आहे. सामान्य कार्यकर्ता ते भाजपाचे अध्यक्ष व आता केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा गडकरी यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी, असा आहे. आजवर साधेपणाने वाढदिवस साजरा करणार्‍या गडकरींचा यंदाचा वाढदिवस कार्यकर्ते जल्लोषात साजरा करणार आहेत. नागपुरातील कस्तूरचंद पार्कवर हा सोहळा होणार आहे.

शनिवार, २७ मे रोजी सायंकाळी ६ वा. हा नागरी अभिनंदन सोहळा होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण शरद पवार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर यांच्यासह केंद्रीय पातळीवर अनेक महत्त्वाचे नेते, भाजपाशासीत राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. गडकरी या दिवशी वयाची ६0 वर्षे पूर्ण करून ६१व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. यानिमित्त भाजपातर्फे त्यांना ६१ लाख रुपयांच्या निधीची कृतज्ञता भेट दिली जाणार आहे. ही रक्कम गोळा करण्यासाठी बँकेत खाते उघडण्यात आले आहे. तर आयोजनासाठी ‘नितीन गडकरी षष्ठय़ब्दिपूर्ती गौरव समारोह समिती’ तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या समितीचे अध्यक्ष असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संयोजक तर सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी हे सहसंयोजक आहेत