७४ महाविद्यालयांवर प्रवेशबंदीची संक्रांत

0
11

नागपूर,दि.7 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ७४ महाविद्यालयांवर प्रवेशबंदीची तलवार कोसळू शकते. या महाविद्यालयांनी अद्यापही ‘एलईसी’साठी (लोकल एन्क्वायरी कमिटी) पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे विद्यापीठाने या महाविद्यालयांना नोटीस बजावली असून १५ दिवसांच्या आत कार्यवाही झाली नाही, तर पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यास बंदी लावण्यात येऊ शकते, अशी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील १२२ महाविद्यालयात अद्यापही संलग्नीकरण सुरू रहावे किंवा नूतनीकरणासाठी अर्ज सादर केलेले नाहीत. यातील अनेक महाविद्यालये अनेक वर्षांपासून केवळ कागदांवरच आहेत. उर्वरित महाविद्यालयांना सातत्याने ‘एलईसी’ची प्रक्रिया राबवून घ्यावी लागते. विद्यापीठात नियमांनुसार प्राध्यापक तसेच इतर सोयी-सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठातर्फे ‘एलईसी’ नेमण्यात येते. मात्र महाविद्यालयांना संबंधित समितीला बोलवावे लागते.

यासंदर्भात ७४ महाविद्यालयांनी कुठलीही हालचाल केलेली नाही. या महाविद्यालयांना वारंवार विचारणादेखील करण्यात आली. मात्र तरीदेखील काही फरक पडलेला नाही.यासंदर्भात विद्यापीठाने आता कडक पाऊल उचलण्याचे ठरविले आहे. या महाविद्यालयांना नोटीस बजाविण्यात आली आहे. जर महाविद्यालयांनी १५ दिवसांत ‘एलईसी’ला बोलाविले नाही व प्रक्रिया राबविली नाही तर त्यांच्यावर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात येईल. पुढील शैक्षणिक सत्रात ते प्रवेशप्रक्रिया राबविण्यास पात्र ठरणार नाहीत, असे डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.