भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठक; मंत्रिमंडळातील खांदेपालटावर चर्चेची शक्यता

0
10

मुंबई, दि. 16- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठक होणार आहे.आज संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातील खांदेपालटावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.घोटाळ्याचे आरोप झालेले गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती पण मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली. सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार आहे. मात्र विरोधकांनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचीही मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याची शक्यता आहे.एसआरए घोटाळ्याची ही मालिका मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीची ठरु लागली आहे. शिवाय मेहतांना हटवलं नाही, तर खडसेंवर अन्याय झाल्याची भावना एका समाजात बळावू शकते आणि सरकार बिल्डरधार्जिणं असल्याचा प्रचारही वाढू शकतो. त्यामुळे मेहतांना विश्रांती देण्याची सक्ती होणार आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.