ग्रामसेवकांच्या कालबद्ध पदोन्नती रखडल्या

0
14

भंडारा,दि.16 : जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गातील कालबद्ध पदोन्नती मागील अनेक वर्षांपासून निकाली काढण्यात आल्या नसल्याने शेकडो ग्रामसेवकांवर हा अन्याय होत असून हे काम त्वरित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयनने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत युनीयनच्या वतीने शिष्टमंडळ त्यांना भेटले.
या माध्यमातून युनीयनने त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व विभागीय संघटनेचे पदाधिकारी अतुल वर्मा, जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, विलास खोब्रागडे, सरचिटणीस शाम बिलवणे आदींनी केले.यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे गोपनीय अहवाल त्यांना द्यावे, सदर गोपनीय अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाकडे सुव्यवस्थित ठेवण्यासाठी एकत्र फाईलमध्ये ठेवावे, गोपनीय अहवाल मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून न मिळाल्याने ग्रामसेवकांवर पदोन्नतीचा अन्याय होत आहे.प्रलंबित कामांचे प्रकरणे तात्काळ निकाली काढावे, कंत्राटी सेवेतून नियमित सेवा प्रदान ग्रामसेवकांना अनामत रक्कम परत करावी, जिल्ह्यातील नगरपंचायत झालेल्या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांचे पदाचे जिल्हा परिषद विभागात किंवा रिक्त जागी समायोजन करावे, अतिरिक्त प्रभार देण्यात येणारे ग्रामपंचायत साझाचे अतिरिक्त मेहनताना दरमहा वेतनात द्यावा, निलंबित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना कामावर रुजू करावे, वैद्यकीय रजेचे प्रलंबित प्रकरण निकाली काढावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.यावेळी प्रमोद तिडके, राजू महंत, विवेक भरणे, एन.सी. खंडाळकर, एन.जी. सौदागर, जे.एन. बेदी, अनिल धमगाये, एम.एस. शेंडे, रमेश झोडे, यु.के. पाटे, भास्कर रामटेके, एन.सी. बिसेन, अमित चुटे, मंगला डहारे, यामिनी धुळसे, किशोर लेंडे आदींची उपस्थिती होती.