महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएत सामील होणार- राणेंची घोषणा

0
36
मुंबई,दि.06(विशेष प्रतिनिधी)- राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपप्रणित एनडीएत सामील होणार असल्याची घोषणा आज शुक्रवारी केली. दोन दिवसापूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या पक्षाला एनडीएत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. याबाबत पदाधिका-यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय जाहीर करू असे नारायण राणेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. त्यानुसार, आज राणेंनी आपला पक्ष एनडीएत सामील होत असल्याची अपेक्षित घोषणा केली.
मागील आठवड्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’वर भेट घेतली होती. भेटीनंतर राणे म्हणाले होते की, ‘मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याचे आमंत्रण दिले आहे. बैठकीत मंत्रिपदाबाबत कसलीही चर्चा झाली नाही. मंत्री झाल्यानंतर शिवसेना सत्तेबाहेर जाणार असे म्हटले जाते असे तुम्ही म्हणता. मी नुसता पक्ष स्थापन केला तर अनेकांना भीती वाटू लागली आहे, अशी राणेंनी फटकेबाजी केली होती.
सूत्रांनुसार, राणेंचा स्वभाव पक्ष व सरकारला घातक ठरेल, असे मुख्यमंत्र्यांना वाटते. यामुळेच दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहांकडील बैठकीला ते हजर नव्हते. शहांनीही फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असेही नारायण राणे यांना सांगितले होते. मात्र, राणे-फडणवीस बैठकीत सर्व मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतरच फडणवीस यांनी राणेंना एनडीएत सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे. फडणवीस सरकारचा दिवाळीच्या आसपास मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. यात राणेंना मोठे खाते दिले जाईल असे बोलले जात आहे.