गुजरातमध्ये मोदींचा ग्राफ उतरल्याचा अतुल लोंढे यांचा दावा

0
16

नागपूर,दि.6 : गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची फौज पाठविण्यात आली. राज्यातील नेत्यांनी गुजरातमध्ये जाऊन काँग्रेसच्या काळात महाराष्ट्राचा कसा विकास झाला याचा आलेख मांडला. प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे तब्बल दीड महिना गुजरातमध्ये प्रचारासाठी होते. या दीड महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ग्राफ सर्वच वर्गात झपाट्याने वाढला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत तेवढीच घट झाल्याचे लोंढे यांनी म्हटले आहे.
अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर दक्षिण गुजरातचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लोंढे यांना सूरतचे प्रभारी नेमण्यात आले. त्यांनी १२ सप्टेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत दक्षिण गुजरातमधील २० विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. व्यापारी, सामाजिक संघटनांना एकत्र करून त्यांच्यासमोर काँग्रेसची जीएसटी व आर्थिक विषयांबाबत असलेली भूमिका मांडण्याचे काम केले. व्यापारी वर्गात काँग्रेसविषयी असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी पार पाडली. व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची राहुल गांधी व मनमोहन सिंग यांच्यासोबत संवाद घडवून आणला. यातून व्यापारी आणखी काँग्रेसच्या जवळ येण्यास मदत झाली. लिंबायत, वागरा, बारडोली, मजुरा, वाराच्छा या भागात पाटीदार संघटना, शिक्षक संघटनांशी भेटी घेतल्या. जाहीर सभा घऊन काँग्रेसची भूमिका मांडल्याचे त्यांचे म्हणने आहे.जीएसटी व नोटबंदीचा मोठा प्रभाव तेथील जनजीवनावर झाला आहे. गुजरातची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. १ लाख पॉवरलूम बंद झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष उद्योगांना भेटी देणे सुरू केले. त्यावेळी तेथील लोकांना काँग्रेस आपल्यासाठी काही करू शकते, असा विश्वास निर्माण झाला. २०१२ मध्ये मोदींना पंतप्रधान बनवायचे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तेथील जनतेने भाजपाला मतदान केले होते,आता परिस्थिती बदलली आहे.२०१५-१६ मध्ये ३१ जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी २४ काँग्रेसने जिंकल्या होत्या. महापालिका व नगरपालिकांमध्येही मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले आहेत. कोणताच घटक भाजपासोबत नाही. तर राहुल गांधी यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक पातळीवर काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणात तरुण नेतृत्व निर्माण झाले आहे. याचा सकारात्मक परिणाम होऊन गुजरातमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा दावा त्यांनी केला आहे.