माजी मंत्री चतुर्वेदींची काँग्रेसमधून हकालपट्टी

0
15

नागपूर दि. २३ :: माजी मंत्री तसेच शहरातील दबंग नेते अशी ओळख असलेल्या सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. यामुळे शहरातील काँग्रेस नेते व त्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदी यांच्यातील वाद दोन वर्षांपासून विकोपाला गेले होते. मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे एका बाजूला तर सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत आणि अनीस अहमद दुसऱ्या बाजूला असे दोन गट शहरात होते. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना मुत्तेमवार-ठाकरे गटांना झुकते माप देण्यात आले होते. यामुळे चतुर्वेदी यांनी आपल्या समर्थकांना बंडखोरी करायला लावली. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला. ऐवढेच नव्हे तर बंडखोरांच्या प्रचार पत्रकावर स्वतःचे छायाचित्रसुद्धा छापले होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रचाराला नागपूरला आले असता चतुर्वेदींचा एका कट्टर समर्थकाने त्यांच्या अंगावर शाई फेकली तसेच सभेतून अंडीसुद्धा फेकली होती. यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चांगलेच संतापले होते.

पक्षविरोधी कारवायांची दखल घेऊन 23 जानेवारीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. त्याला मुदतीत उत्तरही दिले नाही. त्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारींची शहनिशा करून प्रदेश काँग्रेसने चतुर्वेदी यांना निष्काषित करण्याचा आदेश दिला. प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरून चतुर्वेदी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून पक्षातून निष्काषित करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.