शासनाच्या नाकर्तेपणामुळे देशात अनेक ठिकाणी हिंसाचार

0
11

भंडारा,दि.१०ः-केंद्र शासन तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल २0१८ रोजी विविध संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्या दिवशी भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून आला. त्यात अनेक निष्पाप जीव गेले. विविध राज्यांत जाणीवपूर्वक जातीय, सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केली. सोमवारी, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भंडारा शहरातील गांधी चौकात एकदिवसीय उपोषण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय अनु.जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितिन राऊत, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश सचिव नितिन कुंभलकर, भंडारा निरीक्षक प्रफुल गुडगे पाटील, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव प्रमिला कुटे, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, मधुकर लिचडे, जि.प.सभापती प्रेमदास वणवे, रेखा वासनिक, महिला जिल्हा अध्यक्षा सीमा भूरे, पक्ष नेता शमीम शेख आदी उपस्थित होते.
देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणीवपुर्वक धोका पोहचविण्याचा प्रयत्न होत असताना काँग्रेस पक्ष त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. देशामध्ये व राज्यामध्ये विषारी जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न सत्तारूढ भाजपकडून होत असताना काँग्रेस पक्षाची जबाबदारी वाढली असून सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याची कामगिरी काँग्रेस पक्षाला करावी लागणार आहे, असे आवाहन जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केले.
संचालन अजय गडकरी यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी उपोषण मंडळाला भेट दिली. उपोषणस्थळी अनिकजमा पटेल, धनराज साठवणे, जयश्री बोरकर, युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष प्रसन्ना चकोले, होमराज कापगते, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, सुनील गिर्‍हेपुंजे, शिशिर वंजारी, अवैस पटेल आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.