कोकणातील नाणार प्रकल्प विदर्भाला द्या-आमदार देशमुख

0
7

नागपूर,दि.24 : कोकणातील नाणार प्रकल्प स्थानिक लोक व काही राजकीय पक्षांच्या विरोधानंतर हा प्रकल्प गुजरातमध्ये पळविण्याचे प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्रात  मंजूर झालेला हा प्रकल्प राज्यातच राहावा व तो विदर्भात यावा, अशी मागणी काटोलचे भाजपाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

शासनातील नेत्यांकडून औद्योगिकीकरण व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने विदर्भाच्या विकासाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. काम सुरू आहे, रोजगार सुरू झाले, असे सांगितले जाते, मात्र तसे चित्र अजिबात दिसून येत नाही. उद्योगाच्या नावाने केवळ जागा बळकावण्यात आल्या. रामदेवबाबांचा पतंजली प्रकल्प मार्च २०१७ मध्ये सुरू होईल, असे सांगण्यात आले. मात्र तेथे कम्पाऊंड व गोडाऊन निर्मितीशिवाय काहीच झाले नाही. परिणामी रोजगारासाठी तरुणांच्या स्थलांतरणामुळे एक लोकसभा मतदारसंघ कमी झाल्याची टीका करीत आशिष देशमुखांनी भाजपला घरचा अहेर दिला आहे.
डॉ. आशिष देशमुख म्हणाले, दीड लाख कोटीपेक्षा अधिक थेट विदेशी गुंतवणुकीतून हा प्रकल्प रत्नागिरीच्या नाणार येथे पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र शिवसेना आणि कोकणी जनतेच्या प्रखर विरोधामुळे प्रकल्प ठप्प पडला. विदर्भासारख्या अविकसित प्रदेशात तो झाल्यास येथील कार्गो हब, विमानसेवा, उद्योग, रेल्वे, व्यापाराला चालना मिळेल. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दीड लाख रोजगारनिर्मिती होईल. यामुळे हा प्रकल्प विदर्भात व्हावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले होते. नुकतेच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही कोकणातील जाहीर सभेत हा प्रकल्प विदर्भात हलविण्यास संमती दर्शविली.

काटोलजवळ एमआयडीसीची जमीन आणि पाणी उपलब्ध असून सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा. हा प्रकल्प गुजरातला पळविण्याच्या चर्चेकडे लक्ष वेधत यादृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भाचा कायापालट करणारा हा प्रकल्प विदर्भात होण्यासाठी प्रसंगी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेऊ, असेही ते म्हणाले.