विधानपरिषद निवडणुकीत पंकजांकडून धनंजय मुंडेंना धक्का; भाजपाचे सुरेश धस विजयी

0
11

मुंबई,दि.१२:विधान परिषदेच्या उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 80 मतांनी पराभव करत प्रतिष्ठेच्या लढतीत बाजी मारली. मात्र, अधिकृत निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. अशोक जगदाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. जगदाळेंच्या पराभवासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसला व खासकरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. या विजयामुळे पंकजा मुंडे यांनी मनोबल वाढणार असून, पक्षातही त्यांचे वजन वाढणार हे स्पष्ट आहे.

उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मात्र, याबाबत निकालाचे कोणतेही अपडेट दिले जात नव्हते. केवळ 1005 मतदार असल्याने एकूण पाच टेबलावर मतमोजणी प्रत्येकी 200 अशी मतमोजणी झाली. 125 कर्मचाऱ्यांमार्फत मतमोजणीचे काम सुरू होते.उस्मानाबादेत मतमोजणीदरम्यान उमेदवार अशोक जगदाळे आणि सुरेश धस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बाद मतावरून दोघांमध्ये वाद झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करत वाद थांबवला मात्र त्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते. यामुळे पत्रकारांना बाहेर काढले व दरवाजा बंद करून मतमोजणी सुरू केली.