राज्यातील 9 हजार 836 ग्रामपंचायतींसाठी 22, 24 व 30 एप्रिलला मतदान- जे.एस. सहारिया

0
15

मुंबई : राज्यातील 7 हजार 768 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 1 हजार 728 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 22 एप्रिल 2015 रोजी मतदान घेण्यात येईल; तसेच गडचिरोली जिल्ह्यात 340 ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यांत 24 व 30 एप्रिल रोजी मतदान होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज येथे केली. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्री 12 पासून आचारसंहिता लागू होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांमध्ये सर्व जिल्ह्यांतील मे ते ऑगस्ट 2015 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच ठाणे, अकोला, भंडारा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, परभणी, पुणे, सांगली, सातारा आणि वर्धा या 17 जिल्ह्यांतील मे ते सप्टेंबर 2015 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक 714; तर पुणे जिल्ह्यातील 709 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 30 मार्च 2015 रोजी संबंधित ठिकाणी नोटीस प्रसिद्ध केली जाईल. सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 31 मार्च ते 7 एप्रिल 2015 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. 8 एप्रिल 2015 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे 10 एप्रिल 2015 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याचदिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल; तसेच त्यांना चिन्हांचे वाटप केले जाईल. 22 एप्रिल 2015 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान होईल. 23 एप्रिल 2015 रोजी मतमोजणी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधित तहसीलदार निश्चित करतील. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असे श्री. सहारिया यांनी सांगितले.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील द्यावा लागेल. विहित मुदतीत खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध कार्यवाही केली जाईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

गडचिरोलीत 24 व 30 एप्रिलला मतदान
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 340 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 83 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा तालुक्यांतील ग्रामपंचायतींसाठी 24 एप्रिल 2015 रोजी; तर उर्वरित तालुक्यांतील ग्रामपंचायतींसाठी 30 एप्रिल 2015 रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 3 या कालावधीत मतदान होईल. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी 2 मे 2015 रोजी होईल.

गोंदिया जिल्ह्यातील 191 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात इतर जिल्ह्यांसोबतच म्हणजे 22 एप्रिल 2015 रोजी मतदान होईल; परतुं देवरी, आमगाव व सालेकसा या तीन तालुक्यांत मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3 या कालावधीत मतदान होईल. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी 23 एप्रिल 2015 रोजी होईल.

जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या:
कोकण: ठाणे-33, रायगड-33, रत्नागिरी-470, सिंधुदुर्ग-72. नाशिक: नाशिक-595, धुळे-220, जळगाव-2, अहमदनगर-275, नंदुरबार-60. पुणे: पुणे-709, सोलापूर-127, सातारा-714, सांगली-99, कोल्हापूर-424. औरंगाबाद: औरंगाबाद-46, बीड-106, नांदेड-44, परभणी-524, लातूर-404, हिंगोली-468. अमरावती: अमरावती-552, अकोला-220, यवतमाळ-663, वाशीम-163, बुलढाणा-229. नागपूर: नागपूर-129, वर्धा-47, चंद्रपूर-1, भंडारा-148, गोंदिया-191, गडचिरोली-340. एकूण- 8 हजार 108.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम-
• निवडणूक नोटीस प्रसिद्धीचा दिनांक: 30 मार्च 2015
• नामनिर्देशनपत्रे देणे व स्वीकारणे: 31 मार्च ते 7 एप्रिल 2015
• नामनिर्देशनपत्रांची छाननी: 8 एप्रिल 2015
• नामनिर्देशनपत्रे मागे घेणे: 10 एप्रिल 2015
• निवडणूक चिन्हांचे वाटप: 10 एप्रिल 2015
• मतदान: 22 एप्रिल 2015
• मतमोजणी: 23 एप्रिल 2015