ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात किरीट सोमय्याना उमेदवारी मिळणे कठीण ?

0
46

शेखर भोसले, मुलुंड पूर्व,दि.20ःः-लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि नुकतीच भारतीय जनता पक्षाने राज्यातील आपल्या १६ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचे नाव नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी राज्यातील नेत्यांशी शनिवारी मध्यरात्री केलेल्या चर्चेत ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी किरीट सोमय्या सोबत अजून एक नाव सुचवावे, असे सांगितले. त्यानुसार सोमय्या यांच्याबरोबरच आणखी एका नावाची शिफारस संसदीय मंडळाला करण्यात आली असे समजते त्यामुळे सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत आली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मागील लोकसभेत बहुमताने सत्तेत आल्यानंतर व २०१४ च्या विधानसभेसाठी युती तुटल्यानंतर किरीट सोमय्या यांनी सातत्याने शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बांद्राचा माफिया व इतर अनेक वैयक्तिक आरोप केले होते तसेच २०१६ साली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या दिवशी देखील मुलुंड पूर्व येथील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे व शिवसेनेवर टीका केल्यामुळे शिवसैनिकांनी किरीटवर हल्ला केला. त्यामुळे चिडलेल्या सोमय्यानी शिवसेनेच्या १६ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला व अजूनही ती केस चालू आहे त्यामुळे मुलुंड मधील शिवसैनिकांचा किरीटवर रागच आहे व त्यात जर किरीट सोमय्याना पुन्हा ईशान्य मुंबई लोकसभेची उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार नाही व मतदान देखील करणार नाही असे नाराज शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना भेटून सांगितले आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईला किरीट सोडून इतर कोणीही उमेदवार दयावा असेच शिवसैनिकांचे मत आहे. त्यामुळे जरी युती झाली असली तरीही ईशान्य मुंबई मतदारसंघातील शिवसैनिक भाजपला मतदान करतील याची खात्री देता येत नाही, असा दोन्ही पक्षातील नेत्यांचा होरा आहे. त्यातच शिवसेना नेतृत्वही सोमय्या यांच्याविषयी कमालीचे नाराज आहे. किरीटप्रति शिवसैनिकांमध्ये कमालीचा राग, युतीसाठी शिवसेनेने प्रतिसाद दिल्याने व तसेच सध्या प्रत्येक जागा जिंकणे महत्वाचे यामुळे शिवसेनेला दुखाविण्याची भाजपची तयारी नाही आहे.

विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा यंदाचा लोकसभेचा मार्ग तसा खडतरच दिसत आहे. आघाडीच्या काळात फूटपट्टीने रेल्वे व फलाटातील अंतर मोजणारे सोमय्या आपल्या मतदार संघातील सर्वच रेलवे स्थानकाच्या फलाटाच्या उंची वाढविण्यात यशस्वी नाही झाले, मुलुंड डम्पिंग ग्राऊंडच्या प्रश्नावर कोणताच तोडगा निघाला नाही. आजही मुलुंडकरांसाठी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. विरोधात असताना डम्पिंग ग्राऊंड, लोकल सेवेमधील सुधारणा, फ्लाय ओव्हरचा प्रश्न अशा मुद्द्यांवर रान उठवणाऱ्या किरीट सोमय्यांना गेल्या ४ वर्षांत हे मुद्दे सोडवता आलेले नाहीत. विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आघाडीवर राहिलेले सोमय्यानी गेल्या पाच वर्षांत काय केले, असा सवाल विरोधक करीत आहेत. २०१४मध्ये काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारविरोधात घोटाळ्यांची मालिका उघड करणाऱ्या किरीट सोमय्यांपुढे आता त्यांनी न सोडवलेल्या प्रश्नांची मालिका आहे. किरीट सोमय्याचा मराठी माणसांबद्दल असलेला द्वेष त्यामुळे प्रचाराच्या काळात गुजराती, मराठी भाषिक वाद निर्माण झाला तर व त्याप्रचाराने भाषिक, जातीय वळण घेतल्यास भाजपाच्या अडचणी वाढू शकतात. त्यातच भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणात सोमय्या डेंजर झोनमध्ये असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सोमय्या ह्यांच्या जागी नवा चेहरा किंवा अनुभवी उमेदवार देवून ईशान्य मुंबई आपल्याकडेच ठेवण्याचा भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व विचार करीत आहे.

दुसरीकडे तरुण कार्यकर्त्यांची फळी, आर्थिक बळकटी, मराठी-आगरी समाज पाठिशी, शिवसेना, मनसे कार्यकर्त्यांचे सहकार्य व किरीट सोमय्याबद्दल असलेली नाराजी ह्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्याबाजूने मतदारसंघात वातावरण होत आहे. तसेच ईशान्य मुंबई मतदारसंघाचा खासदार प्रत्येक ५ वर्षाने कॉंग्रेस किंवा भाजप किंवा राष्ट्रवादी असा बदलत आलेला आहे. कोणत्याही एका पक्षाचा खासदार येथे सतत ५ वर्षापेक्षा जास्त राहिलेला नाही आहे असे इतिहास सांगतो.