राहुल गांधी यांची आज नागपूरात सभा

0
13

नागपूर,दि.04ः-लोकसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राज्यातील त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ आज, गुरुवारी नागपुरात करणार आहेत.राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांची कस्तूरचंद पार्कवरील पहिली सभा असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे लागले आहे. मोदी सरकारविरुद्ध दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची घोषणा गांधी यांनी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथील सभेत केली होती. यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात नामांकनअर्ज दाखल करून ते सायंकाळी ५ वाजता नागपुरातील पक्षाचे उमेदवार नाना पटोले आणि रामटेकमधील किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील सभेला अल्प उपस्थिती व भाजप नेत्यांच्या सभांना अल्प प्रतिसाद लाभत असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. काँग्रेसने मंगळवारी जाहीरनामा जाहीर केला. यानंतर मध्यभारतातील ही पहिलीच सभा आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सायंकाळी गोंदिया येथील सभेत जाहीरनाम्यावर कडाडून हल्ला केला. त्यास गांधी कसे प्रत्युत्तर देतात व कशी सभा राहील, हा औत्सुक्याचा विषय झाला आहे. सभेसाठी नागपुरातील कार्यकर्त्यांवर भर देण्यात आला आहे. रामटेक मतदारसंघाच्या सीमावर्ती भागातील कार्यकर्ते येण्याचा अंदाज आहे. शहराध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वाखाली प्रचार आणि सभेचे नियोजन करण्यात आले आहे.विदर्भाने नेहमी काँग्रेसला साथ दिली आताही वैदर्भीयांचा आशीर्वाद मिळेल, असा विश्वास पक्षाचे सहप्रभारी आशिष दुवा यांनी व्यक्त केला. यासभेनंतर गांधी पुण्याला जातील व शुक्रवारी चंद्रपूर आणि वर्धा येथे त्यांच्या सभा होणार आहेत. बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांची उद्या, शुक्रवारी दुपारी १२ वाजता कस्तूरचंद पार्कवरच सभा होणार आहे.