अशोक नेतेंची १७ टक्के मते कापणे,डॉ.उसेंडीपुढे आव्हान

0
22

गडचिरोली,दि.५: गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदार अशोक नेते व मागील वेळचे पराभूत उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी या जुन्याच पहलवानांमध्ये लढत होणार असली; तरी अशोक नेते यांची २०१४ च्या निवडणुकीत वाढलेली १७ टक्के मते कापणे, हे प्रमुख आव्हान यावेळी डॉ.नामदेव उसेंडी यांच्यापुढे असणार आहे.

२००९ मध्ये प्रथमच चंद्रपूर व चिमूर या दोन लोकसभा मतदारसंघांचा काही भाग एकत्र करुन गडचिरोली-चिमूर या नव्या लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी तेव्हाच राखीव करण्यात आला. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने तीनदा आमदार व एकदा मंत्री राहिलेल्या मारोतराव कोवासे यांना तिकिट दिले होते, तर भाजपने दोनदा आमदार राहिलेल्या अशोक नेते यांना रिंगणात उतरविले होते. त्यावेळी ३ लाख २१ हजार ७५६ मते घेऊन मारोतराव कोवासे विजयी झाले, तर अशोक नेते यांना २ लाख ९३ हजार १७६ मते मिळाली होती. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार सत्यवानराव आत्राम यांनी १ लाख ३५ हजार ७५६ मते घेतली होती. म्हणजेच कोवासे यांनी एकूण मतदानाच्या ३८.४८ टक्के, तर नेते यांनी ३५.०६ टक्के मते घेतली होती.

२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ.नामदेव उसेंडी यांना तिकिट दिले, तर भाजपने पुन्हा अशोक नेते यांनाच रिंगणात उतरविले होते. तेव्हा नेते यांनी ५ लाख ३५ हजार ९८२ मते मिळवून विजय संपादन केला, तर डॉ.उसेंडी यांना २ लाख ९९ हजार ११२ मते घेऊन पराभूत व्हावे लागले होते. टक्केवारीचा विचार केला तर अशोक नेते यांना ५२.३८ टक्के आणि उसेंडी यांना २९.२३ टक्के मते मिळाली. दोन्ही निवडणुकीतील मतांचा हिशोब केला तर अशोक नेते यांची मते २००९ पेक्षा २०१४ मध्ये १७ टक्क्यांनी वाढली आणि उसेंडी यांची मते ९ टक्क्यांनी कमी झाली. म्हणजेच, नेते यांनी २ लाख ४२ हजार ८०६ मते अधिकची घेतली आणि डॉ.उसेंडी यांच्या मतांमध्ये २२ हजार ६४४ मतांची घट झाली. यावरुन कोवासे आणि उसेंडी यांच्या मतांचा विचार केला तर काँग्रेसची मते ३ ते सव्वातीन लाखापर्यंतच आहेत. आता मोदींची लाट नसल्याने या मतांमध्ये वाढ झाली तरी ती जास्तीत जास्त साडेतीन किंवा पावणेचार लाखांपर्यंत पोहचतील. काँग्रेसची मते वाढली तरी, मतांचा लेखाजोखा बघितल्यास अशोक नेते ८५ हजारांनी पुढे राहू शकतात. अर्थात कोण पुढे राहील, हे प्रचार शिगेला पोहचल्यानंतर आणि ऐनवेळी होणाऱ्या घडामोडींवरही बऱ्याच अंशी अवलंबून असणार आहे. शिवाय, बहुजन वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी आणि आंबेडकराईट पार्टी या तीन पक्षांची घोडदौडसुद्धा जय-पराजयाच्या गणितात महत्वाची ठरणार आहे.

त्यामुळे एकंदरित परिस्थिती पाहता, मागील निवडणुकीत १७ टक्क्यांनी वाढलेली अशोक नेते यांची मते कापणे, हे डॉ.नामदेव उसेंडी यांच्यापुढील खरे आव्हान असेल, असे राजकीय जाणकारांना वाटत आहे.