आसोली जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे महारवाडे,माहुरकुड्यात भैसारे विजयी

0
13

गोंदिया,दि.२४ : तालुक्यातील आसोली जिल्हा परिषद क्षेत्राच्या रिक्त जागेसाठी रविवारी (दि.२३) घेण्यात आलेल्या मतदानात ७३.४० टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत क्षेत्रातील १२ हजार ७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.त्या निवडणुकीची मतमोजणी आज(दि.24) येथील प्रशासकीय इमारतीमध्ये पार पडली.या निवड़णुकीत काँग्रेसचे सुरजलाल महारवाडे यांनी भाजपचे परसराम हुमे यांचा सुमारे 888 मतांनी पराभव केला आहे.तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे संघदिप विजय भैसारे यांनी 1981 मते घेत विजय मिळविला.त्यांनी भाजपचे उमेदवार विनेश निलकंठ शहारे यांचा पराभव केला.शहारे यांना 1587 मते मिळाली. गोरेगाव पंचायत समितीच्या घोटी पंचायत समितीकरीता झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या चर्जे या निर्विरोध निवडून आल्या.

निवडणुक अधिकारी व प्रभारी उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांनी विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र दिले.त्यानंतर काँग्रेसचे विजयी उमेदवार सुरजलाल महारवाडे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.त्यांच्या विजयी मिरवणुकीत काँग्रेस युवा नेते प्रफुल अग्रवाल,प्रकाश रहमतकर,अड.पी.सी.चव्हाण,दिपल अग्रवाल,देवा रुसे,सहसराम कोरेट,चमण बिसेन,रवि तरोणे,विकास बंसल आदी सहभागी झाले होते.सुरजलाल महारवाडे यांना6223 तर भाजपचे परसराम हुमे यांना  5339 मते मिळाली.शिवसेनेचे गजानन महारवाडे यांना 303 मते मिळाली.
आसोली जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य शेखर पटले यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.लोकसभा निवडणुकीत या जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवाराला जवळपास 3 हजार मतांची आघाडी होती.मात्र जि.प.पोटनिवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला.

१९ केंद्रांवरून रविवारी (दि.२३) घेण्यात आलेल्या मतदानात क्षेत्रातील ७ हजार ९९० पुरूष तर सहा हजार ८९ महिला अशाप्रकारे एकूण १२ हजार ७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विशेष म्हणजे, मतदान प्रक्रीया सुरू असताना क्षेत्रातील ग्राम मोरवाही येथे दोन्ही पक्षाच्या गोंदिया येथील कार्यकर्त्यांना बघून गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. या मतदारसंघातील मोरवाई येथे मतादनाच्यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व काँग्रेसचे पंचायत समितीसदस्यामध्ये बाचाबाची झाल्याने वातावरणही तापले होते.पोलिसांनी ऐनवेळी मध्यस्ती करून वाद मिटविल्याची माहिती आहे. यामुळे काही काळ मोरवाहीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.