मुंबई दि.27- भाजपसोबत युती तोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठींब्याने सत्तास्थापनेचा प्रयत्न करत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र बहुमत सिद्ध करण्याच्या एक दिवस आधीच अजित पवारांनी राजीनामा देऊन,घरवापसी केली. तर अजित दादांनी ही चूक स्वीकारली असून, शरद पवारांनी सुद्धा त्यांना माफ केलं असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी माहिती दिली. गेल्या आठवड्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार निश्चित झाले असताना अचानक काही आमदारांना घेऊन अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. हा बंड शांत करण्यासाठी पवार कुटुंबियांनी अजित पवारांच्या अनेक भेटी घेतल्या. त्याला मंगळवारी यश आले आणि अजित पवारांनी राजीनामा दिला. यानंतर भाजपचे 4 दिवसांचे सरकार पडले. पुढे बोलताना त्यांनी भाजपचा सुद्धा समाचार घेतला. भाजप हा कधीच मोठा पक्ष नव्हता. त्यांना सत्तेची सूज आली होती. मात्र आता सत्ता गेल्याने ही सूज हळूहळू नक्कीच कमी होईल असा,खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी मलीक बोलत होते.
मला मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंवर -अजित पवार
यावर सविस्तर माहिती देताना नवाब मलिक म्हणाले, “शेवटी, अजित दादांनी आपली चूक मान्य केली. हा एक कौटुंबिक मुद्दा असून पवार साहेबांनी त्यांना माफ केले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहतील. पक्षात असलेली त्यांची भूमिका आणि प्रतिष्ठा बदलणार नाही.” वृत्तसंस्थेशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते बोलत होते. दरम्यान, अजित पवारांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना आपण राष्ट्रवादीतच आहोत असे स्पष्ट केले. “यापूर्वीही राष्ट्रवादीत होतो आणि यापुढेही पक्षातच राहील. राष्ट्रवादीने मला पक्षातून काढलेले नाही. मी राष्ट्रवादीचाच आहे.” यासोबतच त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याचा निर्णय आता भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असेही अजित पवार यांनी सांगितले.





