मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.01:शिवसेना नेते संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज आहेत अशी चर्चा मंत्रीमंडळ विस्ताराच्यादिवशी रंगली होती. मात्र या चर्चांना अर्थ नाही असे खुद्द संजय राऊत यांनी स्पष्ट केल होते. त्या स्पष्टीकरणाला दोन दिवस उलटत नाहीत तोच संजय राऊत यांनी जी फेसबुक पोस्ट लिहिली आहे, त्यावरुन ते उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत का? अशी चर्चा रंगली आहे. “हमेशा ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये जिसने आपको ये तीन भेंट दी हो, साथ, समय और समर्पण.’ या पोस्टसाठी संजय राऊत यांनी निवडलेला फोटोही सूचक आहे. एका हातातून वाळू निसटताना दाखवण्यात आली आहे.त्यांची ही सूचक पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांचा रोख नेमका कुणावर आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा होता. सरकार स्थापनेच्या संपूर्ण प्रक्रियेत ते सातत्याने आघाडीवर होते. शरद पवारांशी त्यांची असलेली जवळीक सरकार स्थापनेमध्ये महत्त्वाची ठरली असल्याचंही बोलले जाते. त्यामुळं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. मात्र, शिवसेनेने तीन अपक्षांना संधी दिल्याने सुनील राऊत यांचे नाव मागे पडले. त्यावरून संजय राऊत नाराज असल्याचे बोलले जात होते. सुनील राऊत राजीनामा देणार, अशाही चर्चा होत्या.





