गोंदिया,दि.29 : राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख हे नुकतेच जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. दरम्यान त्यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेना जिल्हा समन्वयक पंकज यादव यांनी पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या भेट घेवून होमगार्डच्या समस्या मांडल्या. होमगार्ड यांना पुर्वीप्रमाणे सेवेत पुर्ववत करून न्याय द्यावा, अशा मागणी निवेदनातून केली.
ना.अनिल देशमुख हे जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून प्रभावीपणे उपाययोजना करून कोरोना विषाणूला प्रतिबंध घाला तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. पालकमंत्र्यांच्या गोंदिया आगमनावर शिवसेना जिल्हा समन्वयक पंकज यादव यांनी ना.देशमुख यांची भेट घेतली. दरम्यान, कोरोना विषाणू पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील परिस्थितीला घेवून चर्चा करण्यात आली. यानंतर दुग्ध उत्पादक शेतकरी व होमगार्ड यांच्या समस्या पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्ह्यात ६00 होमगार्ड असून कामाअभावी त्यांच्यावर बेरोजगारीची कुर्हाडी कोसळली आहे. आपत्ती काळात पोलिसांना मदत म्हणून होमगार्डना कामावर घ्यावे, अशी मागणी केली. तसेच दुग्ध उत्पादक शेतकर्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासकीय दुग्ध संघ लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून पंकज यादव यांनी पालकमंत्री देशमुख यांच्याकडे केली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





