25.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home राजकीय लोकप्रिय सीएम यादीत उद्धव ठाकरे 5 व्या स्थानी

लोकप्रिय सीएम यादीत उद्धव ठाकरे 5 व्या स्थानी

भाजपशासित राज्यांच्या एकाही मुख्यमंत्र्यांना यादीत स्थान नाही

0
747

मुंबई(वृत्तसंस्था)दि.04. आयएएनएस आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्वेक्षणामध्ये देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थान पटकावले आहे. उद्धव यांना ७२.५६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली असून देशातील ५ व्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपशासित राज्याच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. ८२.९६ टक्के लोकांनी पटनायक यांच्या कामाबद्दल समाधानी असल्याचे म्हटले आहे. त्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर छत्तीसगडमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (८१.०६ टक्के), तिसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन (८०.२८) यांचा समावेश आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर असण्याचा मान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (७८.५२ टक्के) यांना मिळाला आहे.

पाचव्या स्थानावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांचे नाव आहे. केजरीवाल यांना ७४ टक्के मते आहेत.

हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर सर्वात कमी लोकप्रिय

सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये हरयाणाचे मनोहर लाल खट्टर (४.४७ टक्के मते), उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (१७.७२) आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (४२.७९) या तीन भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. तळाच्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (३०.८२) आणि काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (२७.५१) यांचा समावेश आहे.