25.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ बिरसी विमानतळावरील प्रकार :तक्रार केल्यावरून महिलांना काढले कामावरून

बिरसी विमानतळावरील प्रकार :तक्रार केल्यावरून महिलांना काढले कामावरून

0
1062

गोंदिया,दि.04 : भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या बिरसी येथील विमानतळावर नियाटम विभागात माळीकाम करणाऱ्या महिला आणि पुरूष अशा १७ जणांना टेंडर संपल्याचे कारण पुढे करून २८ फेब्रवारी पासून कामावरून बंद करण्यात आले. २००९ पासून इमानेइतबारे काम करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली. महिलांशी असभ्य वागणूक करणाऱ्या सुपरवायजरची तक्रार केल्यामुळे आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप मजुरांनी केली.

बिरसी येथील निमानतळ प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय उड्डयन आणि प्रशिक्षण संस्था, नियाटम कार्यरत आहे. या संस्थेत विमानतळाचे काम सुरू झाल्यापासून २००९ पासून बिरसी गावातील प्रकल्पग्रस्त व इतर गरीब महिला कंत्राटी स्वरुपात माळी कामगार म्हणून काम करत आहेत. या महिला कामावर सुरू असताना ऑक्टोबर २०१९ मध्ये सुपरवाईजरकडून येथील महिलांवर अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाची तक्रार महिलांनी विमानतळ व जिल्हा प्रशासनाकडे लेखी स्वरुपात केली होती. महिलांशी असभ्य वागणूक करणाऱ्या सुपरवाईजर विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. या घटनेला आठ महिन्यांपासून अधिकचा काळ लोटला असला तरी जिल्हा व विमानतळ प्राधिकरणाने त्या सुपरवाईजर विरोधात कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही. उलट तक्रार केल्याचा बदला म्हणून त्या महिलांना २८ फेब्रुवारी रोजी कामावरून बंद करण्यात आले. टेंडर संपल्याचे कारण पुढे करण्यात आले. कामावरून कमी करण्यात आलेल्या महिलांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकूवत असून हातचे काम बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबासमोर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्याला कामावर पूर्ववत घेण्यात यावे, या मागणीला घेवून अन्यायग्रस्त महिलांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना भेटून विनवणी केली. मात्र महिलांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांना परत पाठविण्यात आले. महिला अत्याचाराच्या घटनांना प्रथम प्राधान्य देत कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महिलांनाच कामावरून बंद करून विमानतळ प्राधिकरणाने नवा पायंडा घातल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिला अत्याचाराची एवढी मोठी घटना घडून देखील विमानतळ व जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची साधी चौकशी देखील न करता नियाटम विभागातील अधिकारी आणि सुपरवाईजरचा बचाव करण्यात धन्यता मानण्यात आल्याचा आरोप देखील महिलांनी केली.

स्थानिक कामगारांना सापत्न वागणूक

जिल्ह्याचा विकास जलद गतीने व्हावा व प्रकल्पबाधित परिसरातील नागरिकांच्या हाताला रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता तत्कालीन उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी हा प्रकल्प खेचून आणला होता. असे असले तरी या प्रकल्पात स्थानिकांना नजरअंदाज करून बाहेरील व्यक्तींना कामावर घेण्यात आले. त्यामुळे खरे प्रकल्पग्रस्त आजही रोजगारापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे. परिणामी बाहेरचे अधिकारी आणि कर्मचारी स्थानिक कामगारांवर अत्याचार करत असल्याचा आरोप देखील पिडीत महिलांनी केली.

आमच्यावर अन्याय झाल्यामुळे वरिष्ठांकडे त्याची तक्रार केली होती. परंतु, त्या तक्रारीची चौकशी देखील करण्यात आली नाही. उलट टेंडर संपल्याचे कारण पुढे करून आम्हाला कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.

अनिता मेश्राम, पिडीत कामगार