वाशिम येथे खेलो इंडिया कबड्डी प्रशिक्षण केंद्र; विदर्भातील एकमेव कबड्डी प्रशिक्षण केंद्र

0
11

वाशिम, दि. 24 : भारत सरकारच्या भारतीय खेल प्राधिकरण अंतर्गत विविध राज्यात खेलो इंडिया या योजनेअंतर्गत वाशिम येथे विदर्भातील एकमेव खेलो इंडिया कबड्डी प्रशिक्षण केंद्रास केंद्र सरकारने मान्यता प्रदान केली आहे. त्याअनुषंगाने अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी नुकतीच वाशिम जिल्हयातील विविध शाळांची व क्रीडा संघटनांची ऑनलाईन सभा आयोजित करुन कबड्डी या खेळाविषयी आढावा घेतला. जिल्हयातील उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या संघास कबड्डी मॅट देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

खेलो इंडिया कबड्डी प्रशिक्षण केंद्रामध्ये खेळाडूंना ट्रॅकसुट, शूज, गेमपँट, टि-शर्ट तसेच आहारामध्ये दोन वेळचे जेवण व दोन वेळचा नास्ता या सुविधा मिळणार आहे. दैनंदिन कबड्डी प्रशिक्षण हे सकाळ व सायंकाळ या दोन सत्रात चालणार आहे. खेळाडूंना मानसोपचार तज्ञ, फिजीओथेरोपिस्ट व आहारतज्ञ इत्यादी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

वाशिम येथील बहुउद्देशिय हॉलची कबड्डी प्रशिक्षण केंद्राच्या अनुषंगाने क्रीडा उपसंचालक श्री. संतान यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, बालाजी शिरसीकर, संजय पांडे, मिलींद काटोलकर, संतोष कनकावार, राजेश गावंडे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.