मानवी जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
गोंदिया, दि.11 : महसुल शासनाचा महत्वाचा विभाग असून जिल्ह्यात येणाऱ्या अनेक घडामोडींना सामोरे जावे लागते. कामाच्या व्यस्ततेतून आरोग्याकडे लक्ष देता यावे यादृष्टीने खेळाकडे वळावे. खेळाच्या माध्यमातून मानसिक व शारिरीक आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मानवी जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेवून विजय मिळवावा, त्यासोबतच विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्याचे नाव लौकीक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.
11 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना आज जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे प्रारंभ झाला. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी क्रीडाज्योत व दीप प्रज्वलित करुन केले. अपर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) चंद्रभान खंडाईत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गोतमारे म्हणाले, मानवाने जीवनात सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे खेळणे व व्यायाम करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाने खेळासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. या स्पर्धेच्या निमित्ताने सराव करावा. खेळ व व्यायाम यांच्या अभावामुळे कमी वयातच व्यक्ती अनेक रोगांना बळी पडत आहेत, म्हणून खेळकडे वळा. दिवसातील अर्धा, एकतास खेळासाठी द्या, असा संदेश देवून ते पुढे म्हणाले, शारिरीक सुदृढतेसोबतच मानसिकदृष्ट्या सुध्दा सुदृढ राहण्यासाठी महसूल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धकांनी खेळाडूवृत्ती जोपासून खेळ खेळावे. खेळाच्या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवावे. सर्व खेळांचा आनंद घ्यावा व मित्रत्वाचे संबंध टिकवून ठेवावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. पिंगळे म्हणाले, शरीर हे क्रीडांगण आहे. आपले शरीर सुदृढ, निरोगी व परिपक्व असले पाहिजे. सुदृढ शरिरात सुदृढ मन असले पाहिजे. खेळल्याने मनुष्याचा शारिरीक व मानसिक विकास होत असतो. प्रत्येकाने रोज सकाळी खेळल्याने व व्यायाम केल्याने शरिरातील मस्तिष्क व मन संतुलीत राहते. शरिराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. खेळल्यामुळे व व्यायाम केल्याने मुनष्य निरोगी राहतो व शरीर बळकट बनते. स्पर्धकांनी खेळ खेळतांना आपली काळजी घ्यावी. स्पर्धकांनी खेळामध्ये वादावाद करु नये. पंचांनी दिलेला निर्णय मान्य करावे असे त्यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी श्री. भुगावकर म्हणाले, महसूल क्रीडा स्पर्धेला एक परंपरा आहे. क्रीडा संस्कृती आपल्या जीवनात रुजविण्याची आज आवश्यकता आहे. खेळात सर्व समावेशकता असली पाहिजे. खेळल्याने व व्यायाम केल्याने आपल्या शरिराचे स्नायु बळकट होत असतात. खेळामुळे सर्वांगीण विकास होत असतो. सर्व स्पर्धकांनी खेळाडूवृत्तीने खेळ खेळावे असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाल्या की, दरवर्षी मससूल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. खेळ हा मानवी जीवनातील एक मुलभूत अंग आहे. महसूल विभागात काम करतांना सर्वांना ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी प्रत्येकाने व्यस्त कामातून खेळासाठी वेळ दिल्यास आपले आरोग्य निरोगी राहते. त्यासोबतच सांघिक भावनेने खेळ खेळावे, त्यामुळे खेळाडूवृत्ती तयार होवून कामात कितीही त्रास झाल्यास मन विचलीत होत नाही. जीवनात मानवाचे आरोग्य सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. सर्व खेळाडूंनी आनंदमय वातावरणात निखळपणे खेळावे व खेळाडूवृत्ती जोपासावी. या महसूल क्रीडा स्पर्धेत एकूण 400 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांनी एकूण 5 उपविभागाचे पथसंचलनाचे निरीक्षण केले. पथसंचलनात एकूण 5 उपविभागापैकी तिरोडा उपविभाग संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना खेळात वचनबध्दता, प्रतिबध्दता व खेळाडूवृत्ती जोपासण्यासाठी क्रीडा विषयक शपथ दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक उध्दव नाईक, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, नाझर राकेश डोंगरे, तलाठी रियाद तुर्क, शिपाई श्री. गुर्व्हेले यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी सर्वश्री वरुणकुमार शहारे (अर्जुनी/मोर), पर्वणी पाटील (गोंदिया) पुजा गायकवाड (तिरोडा), जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसिलदार सर्वश्री अनिरुध्द कांबळे (अर्जुनी/मोर), रमेश कुंभरे (आमगाव), अनिल पवार (देवरी), नरसय्या कोंडागुर्ले (सालेकसा), निलेश काळे (सडक अर्जुनी), गजानन कोक्कडे (तिरोडा), किशन भदाने (गोरेगाव) यांचेसह महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी (सामान्य) चंद्रभान खंडाईत यांनी मानले.