२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे वर्चस्व

0
3

नाशिक दि. 17: सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध कला प्रकारातील सांघिक विजेतेपद यजमान महाराष्ट्राने पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. हरयाणा आणि केरळ यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. समारोप समारंभात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे आणि  क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध आठ कला प्रकारातील विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

नाशिक येथे दिनांक १२ ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडला. या महोत्सवात लोकनृत्य (समूह आणि वैयक्तिक), लोकगीत (समूह आणि वैयक्तिक), घोषवाक्य अथवा एखाद्या विषयावरील सादरीकरण, कथा लेखन, पोस्टर मेकिंग आणि छायाचित्रण अशा कलाप्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली.

महाकवी कालिदास कलामंदिर, महायुवा ग्राम, हनुमाननगर, रावसाहेब थोरात सभागृह, महात्मा फुले कलादालन, उदोजी महाराज म्युझियम आदी ठिकाणी या विविध आठ कलाप्रकारातील स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ३१ राज्यातील युवा स्पर्धकांनी त्यात सहभाग नोंदवला. त्यांच्या सादरीकरणाला नाशिककरांनीही उत्स्फूर्त दाद दिली. मन मोहवणारे लोकसंगीत, लोकनृत्य यांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

महोत्सवाच्या समारोप समारंभात या कलाप्रकारातील विजेत्यांना पालकमंत्री श्री. भुसे आणि क्रीडा मंत्री श्री. बनसोडे तसेच केंद्रीय  क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या संचालक विनिता सुद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे या मान्यवरांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना रोख दीड लाख रुपये, द्वितीय क्रमांकास रुपये एक लाख आणि  तृतीय क्रमांक विजेत्यांना ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

विविध कलाप्रकारातील विजेते खालीलप्रमाणे आहेत. 

सांघिक विजेतेपद: १. महाराष्ट्र, २. हरयाणा, ३. केरळ

लोक नृत्य (समूह): १. महाराष्ट्र, २. केरळ, ३.पंजाब

लोकनृत्य (वैयक्तिक) : १. सृष्टी भारद्वाज, उत्तराखंड २. सनी कुमार, हरयाणा

३ धनिष्ठा काटकर, महाराष्ट्र

लोकगीत (समूह): १. केरळ, २. पंजाब, ३ राजस्थान

लोकगीत (वैयक्तिक):  १. पृथ्वीराज (महाराष्ट्र), २. उमा वर्मा ( मध्य प्रदेश) आणि ३. छायारानी मेलांग ( आसाम).

घोष वाक्य सादरीकरण: १. परिशा मिधा (दिल्ली), २.कार्तिकेय शर्मा  (राजस्थान), ३. शिखा (मध्य प्रदेश).

कथालेखन: १. सृष्टी दीक्षित (उत्तर प्रदेश), २. माही जैन (हरयाणा) आणि ३. नव्या एन. (केरळ)

पोस्टर मेकिंग: १. साहीलकुमार (हरयाणा)

२. महक सैनी (चंदीगड) आणि ३. सौराद्युती सरकार( त्रिपुरा).

छायाचित्रण: १. संकल्प नायक (गोवा),  २. सिमरन वर्मा (दिल्ली) आणि

३. फुन फुन लुखाम (अरुणाचल प्रदेश).