क्रीडा कौशल्य दाखवून जिल्ह्याचा नावलौकीक करा- न्या.गिरटकर

0
12

जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे उदघाटन
गोंदिया,दि.२२ : पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा क्रीडा स्पर्धेतून आपले क्रीडा कौशल्य दाखवून राज्य व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होवून जिल्ह्याचा नावलौकीक करावा. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जी.गिरटकर यांनी केले.
२१ सप्टेबर रोजी कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-२०१६ चे उदघाटन करतांना न्या.गिरटकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी देविदास इलमकर (तिरोडा), श्रीमती दिपाली खन्ना (आमगाव), मंदार जवळे (देवरी), रमेश बरकते (गोंदिया) व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रास्ताविकातून पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ म्हणाले, खिलाडी वृत्तीतून विविध खेळात प्राविण्य दाखविण्याचा प्रयत्न या क्रीडा स्पर्धातून होत आहे. गुणवंत खेळाडूंची निवड या स्पर्धेतून पुढील खेळांसाठी करण्यात येते. या स्पर्धेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिरीरीने भाग घेवून पुढील स्पर्धेसाठी चांगली कामगीर करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली.
जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत आमगाव, देवरी, गोंदिया, तिरोडा व गोंदिया पोलीस मुख्यालयातील जवळपास ३०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील खेळाडूंनी सुरेख पथसंचलन केले. गायत्री बरेजू व सनद सुपारे या खेळाडूंनी आणलेल्या मशालीने न्या.गिरटकर यांनी दीप प्रज्वलीत केली. चंद्रबहादूर ठाकूर या खेळाडूंनी उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. मान्यवरांनी यावेळी विविध रंगांचे फुगे आकाशात सोडले. यावेळी न्या.गिरटकर यांना पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ यांनी स्मृतीचिन्ह भेट दिले.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आमगाव व देवरी संघादरम्यान कबड्डीचा उदघाटकीय सामना घेण्यात आला. यामध्ये आमगाव संघाने विजय संपादन केला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, मुख्यालयाचे राखीव पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक यांचेसह विविध पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच खेळाडू मोठ्या संख्येने क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांनी मानले.