‘तंबाखूमुक्त भारत’साठी स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधन करावे – राजकुमार बडोले

0
17

मुंबई,berartimes.com, दि. 21 : भारत हा 2020मध्ये तरुणांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे.या तरुणांमधील  व्यसनाधीनता ही प्रमुख समस्या निर्माण होत आहे. त्यापासून वाचविण्यासाठी ‘तंबाखूमुक्त भारत’ सारख्या अभियानाची गरज असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी समाजातील तळागाळापर्यंत प्रबोधन करावे, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी केले.

            नरोत्तम सेख्सारिया फाऊंडेशन व सलाम मुंबई फाऊंडेशनच्या वतीने तंबाखूमुक्त भारत अनुदान-पुरस्कारांचे वितरण श्री. बडोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटमधील विभागप्रमुख डॉ. पंकज चतुर्वेदी, डॉ. कैलाश शर्मा, नरोत्तम फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा लेनी चौधरी, सलाम मुंबई फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा राजश्री कदम,डॉ. विरल कामदार, नशाबंदी मंडळाच्या वर्षा विलास आदी यावेळी उपस्थित होते. नरोत्तम सेख्सारिया फाऊंडेशनच्या वतीने एकनाथ कुंभार (कोल्हापूर),रंजना सुखदेव चोरमारे (नागपूर), जहीर रशीद खान (चंद्रपूर) यांना वैयक्तिक कार्यासाठी एक लाखांचा पुरस्कार तसेच अहमदाबादच्या सेंटर ऑफ हेल्थ,नाशिकची लोकविकास संस्थेच्या आशाचा चौधरी, औरंगाबादच्या चेतना फाऊंडेशनच्या गायत्री रंधार यांच्यासह राजस्थान व मध्यप्रदेशातील संस्थांना पाच लाखांच्या अनुदानाचे वाटप यावेळी करण्यात आले.

            श्री. बडोले म्हणाले की, आर्थिक विषमतेमुळे सध्या समाजात गरिब व श्रीमंत अशी दरी निर्माण झाली आहे. मात्र या दोन्ही गटातील युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. समाजात आज फॅशन म्हणून व्यसन करण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे  तरुणांचा देश म्हणून ओळल्या जाणाऱ्या देशापुढे ही समस्या निर्माण झाली आहे. बेरोजगारी सारख्या समस्यांमुळेही तरुण पिढी तंबाखू, मद्य, गुटख्या यासारख्या व्यसनांकडे वळल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. व्यसनाचे हे संकट टाळण्यासाठी शासनाबरोबर स्वयंसेवी संस्थांनी ‘तंबाखूमुक्त भारत’ सारखे उपक्रम राबवून जनजागृती करावी. नरोत्तम सेख्सारिया फाऊंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशन या संस्थांचे यासंदर्भातील काम कौतुकास्पद आहे. यावेळी श्रीमती चौधरी यांनी पुरस्कार वितरणासंदर्भात माहिती दिली. डोंगरीमधील सुपर आर्मी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारूडाच्या माध्यमातून तंबाखूच्या दुष्परिणामाचे सादरीकरण केले.