राज्य युवा पुरस्कार २७ जूनपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

0
9

गोंदिया,दि.२३ : जिल्ह्यातील युवांनी केलेले समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यस्तरावर दरवर्षी युवा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी संबंधितांनी २७ जून २०१७ पर्यंत आपले प्रस्ताव कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावे. राज्यस्तरावर युवा पुरस्कार क्रीडा विभागाचे क्षेत्रीय विभागानुसार प्रत्येक विभागातील १ युवक, १ युवती, १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतील. पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार व्यक्ती ५० हजार रुपये आणि संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार १ लक्ष रुपये असे आहे.
पुरस्कार पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १० वर्षे वास्तव्य असावे. अर्जदार युवक/युवतीचे वय पुरस्कार वर्षातील १३ ते ३५ या वयोगटातील असावे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे उदा.वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्र, चित्रफिती व फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था, युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार पंजीबध्द असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार/संस्थेच्या सदस्याचा पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला देणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.