शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आणि अन्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारीत नियमावली जाहीर

0
23

मुंबई, दि. 17 : महाराष्ट्रातील नामवंत, सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. आता यावर्षापासून क्रीडा पुरस्कार आणि अन्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारित नियमावली शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जाहीर केली. अधिक पारदर्शक करुन ऑनलाईन पध्दतीने आणि नॉमिनेशनदवारे खेळाडूंना पुरस्कार मिळणार असल्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
पुरस्कार नियमावलीमध्ये कालानुरुप आणखी काही बदल करणे आवश्यक असल्याने क्रीडा क्षेत्रातील एकविध संघटना तसेच खेळाडू यांच्याशी विचार विनिमय करुन सुधारणा करण्यासाठी क्रीडा आणि युवक सेवा आयुक्त्‍ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडा महर्षी, क्रीडापटू, क्रीडा कार्यकर्ते आणि संघटक, मार्गदर्शक, साहसी क्रीडापटू आणि दिव्यांग खेळाडू यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करुन 16 ऑक्टोबर 2017 रोजी
सुधारीत नियमावली विहित करण्यात आली आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू),एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, उत्कृष्ट संघटक/कार्यकर्ते, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार या सर्व पुरस्कारांसाठी सर्वसाधारण नियमावली करण्यात आली आहे.जीवनगौरव पुरस्कार पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, तीन लाख रुपये असे आहेृ तर इतर सर्व पुरस्कारासाठी एक लाख रुपये असे स्वरुप आहे.

पुरस्कारासाठी नियमावली :
अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर करावा. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही तसेच अर्ज केलेल्या व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड होईलच असे नाही. अर्जासोबत सादर केलेल्या झेरॉक्स प्रतीवर स्वसाक्षांकित करुन प्रामाणित करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघास संलग्न असलेल्या राज्य पातळीवरील क्रीडा संघटनांनी इच्छूक व्यक्तींच्या कामगिरीच्या तपशीलाची पडताळणी करुन त्यांच्या कार्यकारिणी मंडळाने केलेल्या ठरावाच्या प्रतीसह प्रस्ताव, कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. पुरस्कार विभागून दिला जाणार नाही. एखादया वर्षी पुरस्कारासाठी पात्र अशी व्यक्ती आढळून न आल्यास पुरस्कार घोषित केला जाणार नाही. एखाद्या वर्षी हा पुरस्कार देण्यात न आल्यास पुढील वर्षासाठी जादाचा पुरस्कार म्हणून तो गणण्यात येणार नाही. सदर पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आल्यास सदर व्यक्ती अपात्र समजण्यात येईल. पुरस्कार रद्द करण्याचे अधिकार राज्य
शासनास राहतील आणि तसे घडल्यास पुरस्कार मिळालेली व्यक्ती सदर पुरस्कार  आयुक्तांना परत करेल. पुरस्कार अर्जामध्ये सादर केलेली माहिती खोटी
असल्याचे सिध्द झाल्यास, अशा व्यक्तींना देण्यात आलेला पुरस्कार परत घेण्यात येईल आणि त्यांचे विरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल.

पुरस्कार निवड करण्यासाठी समिती

एकविध खेळाच्या राज्य संघटनेकडून आलेले अर्ज अणि वैयक्तिक अर्ज हे संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जाची छाननी क्रीडा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली समिती करेल आणि शासनाकडे करावयाच्या शिफारशीसाठी पुरस्कार निवड समिती समोर ठेवतील. क्रीडा आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील. क्रीडा सहसंचालक, विभागीय उपसंचालक, राज्यस्तरीय एकविध खेळ संघटनेचे प्रतिनिधी, संबंधित खेळामध्ये प्राविण्य मिळविलेले खेळाडू, संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी हे सदस्य असतील. तर क्रीडा उपसंचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.
क्रीडा आयुक्त सर्व अर्जांची पुन:श्च छाननी केलेले अर्ज प्रमाणपत्राच्या पात्र आणि अपात्रेसह संकेतस्थळावर प्रसिध्द करुन सूचना आणि हरकती 15 दिवसात मागवतील. यावेळी एकविध संघटनेने अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी एखादा खेळाडू अथवा एकही खेळाडू पात्र नाही असे त्याचे मत असेल तर तसे संकेतस्थळावर नोंदविण्यात येईल. तदनंतर अंतिम शिफारशीसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार निवड समितीसमोर ठेवण्यात येईल. प्रस्तावित असलेल्या पुरस्कारार्थींची अंतिम यादी घोषित करण्यापूर्वी संकेतस्थळावर
प्रसिध्द केली जाईल. त्याबाबत कोणाचे आक्षेप किंवा हरकती असल्यास 15 दिवसात लेखी स्वरुपात कळविणे आवश्यक असून अन्यथा पुरस्कारार्थींची अंतिम
यादी घोषित करण्यात येईल.घोषित यादीनंतर कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही.

पुरस्कार निवडीचे वेळापत्रक
दरवर्षी 25 ऑक्टोबर पूर्वी वृत्तपत्रात प्रसिध्दी देऊन क्रीडा आयुक्त यांनी क्रीडा संघटक, मार्गदर्शक आणि खेळाडू यांच्याकडून 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागवावेत. दरम्यानच्या कालावधीत सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी जिल्हयातील सर्व संघटना आणि कार्यकर्ते यांची सभा घेऊन पुरस्काराबाबत सर्व स्थानिक वृत्तपत्रात बातमी दयावी. अर्जदाराने www.mumbaidivsports.com वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर अर्ज करावा. ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी
यांच्याकडे 5 डिसेंबरपूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी.जसे प्रस्ताव येतील त्या प्रस्तावांसोबतची प्रमाणपत्रे जिल्हा क्रीडा अधिकारी आणि उपसंचालक यांनी तपासावीत. यानंतर क्रीडा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती सर्व अर्जांची पडताळणी करेल. क्रीडा आयुक्त यांनी अर्जांची छाननी झाल्यावर पात्र आणि अपात्र उमेदवारांची नावे एकूण गुणांसह संकेतस्थळावर प्रसिध्द करुन हरकती आणि आक्षेप नोंदविणे अपेक्षित आहे.नमूद करण्यात आलेल्या दिनांकानंतर प्राप्त हरकती, आक्षेप आणि सूचनांचा
विचार केला जाणार नाही. राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत छाननी पूर्ण झालेल्या आणि शिफारस करावयाच्या नावांची अंतिम यादी तयार करण्यात येईल.