चंद्रपूरचा ध्रुव कामडी स्केटिंगमध्ये जगात टॉप 100मध्ये

0
19

चंद्रपूर,दि.07 : अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयात अनेक कीर्तिमान आपल्या नावे करणाऱ्या चंद्रपुरातील शिशिर ऊर्फ ध्रुव सुभाष कामडी या स्केटिंंगच्या चिमुकल्या बादशहाने गगनभरारी घेतली असून वर्ल्ड रेकॉर्ड युनियन बुकने त्याची दखल आहे. जागतिक पातळीवरील पहिल्या १०० रेकॉर्डमध्ये ध्रुवची नोंद झाली आहे.
ध्रुवचा हा गौरव सहा देशांच्या रेकॉर्ड बुकच्या मुख्य संपादकांच्या हस्ते येत्या १२ नोव्हेंबरला दिल्लीतील सिरी फोर्ट आॅडिटोरियम येथे एका सोहळ्यात केला जाणार आहेत. याप्रसंगी जागतिक पातळीवरील शंभर रेकॉर्ड होल्डरला प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. मास्टर शिशिर ऊर्फ ध्रुवची वर्ल्ड रेकॉर्ड युनियन बुकमध्ये नोंद झाली असून त्याचे नाव व रेकॉर्ड २०१८ च्या बुकमध्ये प्रकाशित होणार आहे. दरम्यान, त्याला मेडिकल ट्रेनिंगसुद्धा दिले जाणार आहे.
पुणे येथे स्टुडंट परफार्मस रोलर स्केटिंग इन कपल अंतर्गत वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे २० आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ध्रुवने सहभागी व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती. मात्र तत्पूर्वी ८ आॅगस्ट रोजी ध्रुवची आई शिल्पा हिने अचानक जगाचा निरोप घेतला. आईच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्रुव सहभागी झाला होता. त्या दिवशी त्याच्या आईची तेरवी होती हे विशेष.खेळण्या बागडण्याच्या वयात आणि विपरित परिस्थितीत ध्रुवने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. यामध्ये लिंबो स्केटिंगमध्ये गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व इंडियन अ‍ॅचिव्हर बुक आॅफ रेकॉर्ड, स्पीड स्केटिंगमध्ये आशिया बुक आॅफ रेकॉर्ड व इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड आहेत.