विजय, पुजाराचा शतकी तडाखा, भारताकडे 107 धावांची आघाडी

0
8

नागपूर,दि.25(वृत्तसंस्था) : विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा येथील खेळपट्टीवर भारतीय फिरकीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मात्र, जेंव्हा भारतीय फलंदाज खेळण्यास आले, त्यावेळी श्रीलंकेच्या फिरकीला दबावही निर्माण करता आला नाही. पाहुण्या संघातील गोलंदाजांना दाद न देता मुरली विजय व चेतेश्‍वर पुजारा या जोडीने शतके झळकवून दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला मजबूत स्थितीत पोहोचविले. श्रीलंकेच्या सर्वबाद 205 या धावसंख्येला भारताने 2 बाद 312 असे चोख उत्तर देऊन मालिकेत आघाडी घेण्याच्या दिशेने भक्‍कम पाऊल टाकले. विजय-पुजारा जोडीने द्विशतकी भागीदारी करताना अनेक विक्रमही नोंदविले.

विजय आणि पुजाराने जवळ-जवळ पाच तास चिवट फलंदाजी करून श्रीलंकेच्या नवख्या गोलंदाजांना एकप्रकारे धडाच शिकविला. भारताकडे असलेली 107 धावांची भागीदारी लक्षात घेता श्रीलंकेला ही कसोटी वाचविणे निश्‍चितच कठिण जाणार आहे. 1 बाद 11 या धावसंख्येवरून पहिल्या डावाला सुरूवात करणाऱ्या मुरली विजय व चेतेश्‍वर पुजाराने सकाळच्या सत्रात सावध फलंदाजी करताना 86 धावा गोळा केल्या. उपाहाराला 1 बाद 97 अशा सुस्थितीत असलेल्या या दोघांनी त्यानंतरच्या सत्रातही धावांचा वेग कमी होऊ दिला नाही.

कोलकाता कसोटीत संघाबाहेर राहिलेल्या विजयने शिखर धवनच्या अनुपस्थितीचा पुरेपूर लाभ घेत करिअरमधील दहावे शतक झळकावून तिसऱ्या कसोटीसह दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही मजबूत दावा ठोकला. 51 वा कसोटी सामना खेळणाऱ्या विजयने अकरा चौकार व एका षटकारासह 221 चेंडूंत 128 धावा फटकावल्या. त्याने पुजारासोबत 295 मिनिटे चिवट फलंदाजी करीत दुसऱ्या गड्यासाठी 430 चेंडूंत 209 धावांची भागीदारी केली. या मैदानावरील दुसऱ्या गड्यासाठीची ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. दोघांनी आतापर्यंत एकूण दहा शतकी भागीदारी केल्या हे उल्लेखनीय.