इतिहास बदलत विश्वचषकात भारताचा द. आफ्रिकेवर मोठा विजय

0
12

मेलबर्न – शिखर धवनचे शतक आणि गोलंदाजांच्या अचूक कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिका संघावर 130 धावांनी दणदणीत विजय मिळविला आहे. भारताचा या विश्वकरंडक स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय असून, विश्वकरंडक स्पर्धांत दक्षिण आफ्रिकेवर मिळविलेला हा पहिला विजय आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात सात बाद ३०७ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा संघ ४०.२ षटकात १७७ धावांवर संपुष्टात आला. शिखर धवनची शतकी आणि अजिंक्य रहाणेचे ७९ धावांची तडाखेबाज खेळी भारताच्या विजयात महत्त्वाची ठरली. गेल्या अनेक दिवसांपासून फॉर्मात नसलेल्या शिखर धवनला या सामन्यात सूर गवसला आणि त्याने दमदार १३७ धावांची खेळी साकारली. १४६ चेंडूत त्याने १६ चौकार आणि दोन षटकारांची बरसात करत १३७ धावा केल्या.शिखरचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे सातवे शतक आहे. त्याला उत्तम साथ दिली ती अजिंक्य रहाणेने. त्याने ६० धावांत ७९ धावा केल्या. यामध्ये सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. या दोघांनी द.आफ्रिकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.
शिखर धवन मेलबर्न क्रिकेट मैदानावर शतक ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी सौरव गांगुली आणि रोहित शर्माने हा कारनामा केला आहे.धवनने 50 धावा केवळ 70 चेंडूंमध्‍ये केल्‍या. 54 धावांवर असताना हाशिम अमलाने धवनला जीवदान दिले. त्‍याचा पूर्ण फायदा उठवत धवनने तडाखेबंद फलंदाजी केली. शिखर विश्‍वचषकात दक्षिण अ‍ाफ्रिकेविरुध्‍द शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 2011 मध्‍ये 111 धावांची खेळी केली होती.
गेल्या दोन मालिकांत अपयशी ठरलेल्या धवनने गेल्या सामन्यात शतकापर्यंत पोहचण्याचे अपयश या सामन्यात धुवून टाकले. धवनने शतकानंतरही फटकेबाजी सुरूच ठेवली. अखेर धवन 137 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ सुरेश रैनाही फटकेबाजीच्या प्रयत्नात झेल देऊन बाद झाला. रहाणे बाद होईपर्यंत आक्रमक फलंदाजी करत राहिला. अखेर तो 79 धावांवर स्टेनच्या गोलंदाजीवर पायचीत बाद झाला. रहाणेने 60 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 79 धावा केल्या. अखेर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला 300 धावांच्या पार पोहचविले. भारताने निर्धारित 50 षटकात 7 बाद 307 धावा केल्या.

या आव्हानापुढे दक्षिण आफ्रिकेची सुरवात खराब झाली. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विटॉन डॉ कॉक याला मोहंमद शमीने अवघ्या सात धावांवर बाद केले. हाशिम आमला आणि फाप डू प्लेसिस डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, हाशिम आमलाचा सीमारेषेवर शमीने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर सुरेख झेल घेतला. सर्वोत्तम फॉर्म असलेला कर्णधार एबी डिव्हिलर्सने प्लेसिसला साथ देत दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या वाढविण्यास सुरवात केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या शंभरच्या पार नेली. मोठी धावसंख्या उभारण्याच्या विचारात असतानाच डिव्हिलर्स मोहित शर्माच्या चांगल्या फेकीवर 30 धावांवर धावबाद झाला आणि भारताला मोठे यश मिळाले. डिव्हिलर्स बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरने प्लेसिसला साथ देत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहित शर्माने प्लेसिसला धवनकरवी झेलबाद करत भारताला आणखी एक यश मिळवून दिले. प्लेसिस अर्धशतकानंतर लगेच बाद झाला. त्याने 71 चेंडूत 5 चौकारासह 55 धावा केल्या. प्लेसिस बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे ठराविक अंतराने गडी बाद होत गेले. अखेर दक्षिण आफ्रिकेचा डाव 40.2 षटकात 177 धावांत संपुष्टात आला. भारताकडून आर. आश्विनने 3 बळी घेतले. तर, मोहित शर्मा आणि मोहंमद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. शिखर धवनला शतकी खेळीमुळे सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.