कुमार संगकाराने रचला विक्रम

0
4

वृत्तसंस्था
होबार्ट – ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा गुणवान फलंदाज कुमार संगकाराने नवा विक्रम रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग चार शतके झळवकणारा संगकारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
बुधवारी ‘अ’ गटातील स्कॉटलंड विरुध्दच्या सामन्यात संगकाराने या विक्रमाला गवसणी घातली. रविवारी सिडनीमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया विरुध्द शतक झळकवून संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग तीन शतके झळकवणा-या झहीर अब्बास, सईद अन्वर, हर्षल गिब्स, ए.बी.डिविलियर्स, क्विंटन डी कॉक आणि रॉस टेलर यांच्या पंक्तीत स्थान मिळवले होते.
आता सलग चार शतके झळकवण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. बांगलादेशविरुध्द नाबाद १०५ धावा करुन त्याने पहिले शतक झळकवले. त्यानंतर इंग्लंड विरुध्द नाबाद ११७ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिया विरुध्द १०४ धावा करुन तिसरे शतक झळकवले होते.
स्कॉटलंड विरुध्दच्या सामन्यात संगकारा (१२४) धावांवर बाद झाला. त्याने ९५ चेंडूत (१२४) धावा फटकावल्या. त्याच्या शतकी खेळीत तेरा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.