कृषि यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ

0
17

रामभाऊ पटले यांच्या शब्दात ऐकूया त्यांची यशोगाथा…

   मी रामभाऊ चंदनभाऊ पटले, मु.बोदलकसा, ता.तिरोडा, जि.गोंदिया येथील रहिवासी असून माझ्याकडे एकूण 1.79 हेक्टर जमीन आहे. खरीप हंगामात मी भात शेतीची लागवड करतो. सर्व शेती मजुर तसेच यंत्राच्या सहाय्याने करतो. परंतु भात पीक कापणी आणि मळणीच्या वेळी मजुरांचा फार तुटवडा पडतो. त्यामुळे पीक काडतांना खुप अडचण व्हायची व रब्बी हंगामात पीक लागवडीला उशीर होत असे. त्यामुळे मी महाडिबीटी पोर्टलवर कॅम्बाईन हार्वेस्टर या यंत्रासाठी अर्ज केला आणि मला सदर यंत्र मंजुर झाले. मी निकषाप्रमाणे हार्वेस्टर यंत्र खरेदी केले. आज या यंत्रामुळे माझी भात पीक कापणी आणि मळणीचे काम एका दिवसात पुर्ण होते. तसेच सदर हार्वेस्टर यंत्र मी माझ्या गावातील इतर शेतकऱ्यांना कमी दराने भाड्याने दिले, त्यापासून मला 3 लाख 90 हजार रुपये उत्पन्न मिळाले. तसेच मला एक नविन रोजगार मिळाला. यामुळे माझ्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती उंचावली आहे. यासाठी मी कृषि विभागाचा अत्यंत आभारी आहे.

         कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिप्राय :- रामभाऊ चंदनभाऊ पटले मु.बोदलकसा येथील प्रगतशील शेतकरी आहेत. गावात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केली जाते. परंतू भात पिकाच्या कापणी आणि मळणीच्या कामासाठी मजुरांचा खुप तुटवडा असतो. त्यामुळे भात पिकाची कापणी आणि मळणीचे काम वेळेवर होत नव्हते, ही बाब रामभाऊ चंदनभाऊ पटले यांनी ओळखली आणि त्यांनी कृषि विभागाशी संपर्क केला. त्यांना आम्ही हार्वेस्टर यंत्र घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांनी जॉन डीयर कंपनीचे डब्ल्यू 70 मॉडेल किंमत 24 लाख रुपयाला हार्वेस्टर यंत्र विकत घेतले. निकषाप्रमाणे त्यांना कृषि विभागाकडून सदर यंत्राला 8 लाख रुपये अनुदान मिळाले. आता शेतकरी रामभाऊ पटले हे आपले काम पुर्ण करुन इतर शेतकऱ्यांना सदर हार्वेस्टर यंत्र भाड्याने देतात. त्यामुळे गावात भात पिकाची कापणी आणि मळणीचे काम वेळेत पुर्ण होते व त्यांना त्यापासून उत्पन्न मिळत आहे.

   – के. के. गजभिये ,उपसंपादक,जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया­