शेतकऱ्यांतील वाद मिटवत प्रशासनाने मोकळी केली वहिवाट
वाशिम ,दि.२३ जुन : अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या वादामुळे अडथळ्यांत अडकलेले शेतपांदन रस्ते आता पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत आले आहेत. कारंजा तहसील प्रशासनाने राबविलेल्या महिनाभराच्या विशेष मोहिमेत एकूण ४४ शेतपांदन रस्ते अडथळामुक्त करून वहिवाटीस उपलब्ध करून देण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रत्यक्ष बांधावर जाऊन तक्रारींचा निपटारा, आपसी सामंजस्यातून वाद मिटविणे आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर प्रक्रिया राबविणे अशा बहुआयामी प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी ठरली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतील शेतरस्ते अडथळामुक्त करण्याच्या उपक्रमाला कारंजा तालुक्यात प्रभावी स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायती, तंटामुक्ती समित्या, पोलीस पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम केले. अनेक ठिकाणी प्रशासनाने शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत वास्तविक परिस्थिती समजावून सांगितली. परिणामी, न्यायालयीन वाद किंवा संघर्ष न वाढविता परस्पर सहमतीने अनेक प्रश्न मार्गी लागले.विशेष म्हणजे, ३४ शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे व अडथळे दूर करून ते शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले, तर मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ अंतर्गत १० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. आणखी २६ प्रकरणे चालू महिन्याच्या अखेरीस निकाली निघण्याची अपेक्षा आहे.
यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेअंतर्गत मंजूर १७ रस्त्यांची मोजणी पूर्ण करण्यात आली असून त्यावरील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतमाल वाहतूक, कृषी यंत्रसामग्रीची ने-आण आणि शेतीची दैनंदिन कामे अधिक सुलभ होणार आहेत.
मोहिमेचा आणखी एक सकारात्मक पैलू म्हणजे सहकार्याची भावना. स्वखुशीने रस्ते मोकळे करून देणाऱ्या शेतकऱ्यांचा तहसील प्रशासनाने सन्मान केला. त्यामुळे गावोगावी सामंजस्य, संवाद आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
या मोहिमेसाठी तहसीलदारांसह नायब तहसीलदार विनोद हरणे, परिविक्षाधीन तहसीलदार तृप्ती खैरनार, मंडळ अधिकारी लोखंडे, मनवर, खाडे, कटके, धानोरकर, कांबळे, गुगळे, पवार तसेच ग्राम महसूल अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.दरम्यान, शेतपांदन रस्ते अडथळामुक्त करण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असून शेतकरी बांधवांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून परस्पर सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.





